मुंबई – गणेश तळेकर
दि. 7 फेब्रुवारी 2024 च्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे सोशल सर्विस लीग ने नाट्यगृह आणि शाळा पुनर्विकास यांचा सुधारित आराखडा सदर करणे अपेक्षित होते. पण तसे न करता, आहे तोच प्लॅन पुढे रेटण्याच्या प्रयत्न सोशल सर्विस लीगच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने दि 15 फेब्रुवारी 2024 रोजी दामोदर नाट्यगृह प्रश्नी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, गिरगाव येथे मा. दीपक जी केसरकर यांनी बोलाविलेल्या सहकारी मनोरंजन मंडळ, सोशल सर्विस लीग आणि संबंधित महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत अपेक्षित तोडगा निघू शकला नाही.
“तुम्हाला सुधारित आराखडा सादर करण्यास सांगितले होते तो अजून सादर का नाही झाला.? नाट्यगृह हे दर्शनी भागातच हवे. आत कोपऱ्यात गेल्यास नाट्यगृह चालणार नाही आणि नाट्यगृहाच्या जागी शाळा बांधल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षिता ही धोक्यात येईल. नाट्यगृह दर्शनी भागात असेल तसेच शाळा आणि नाट्यगृह एकाचवेळी सुरू होईल अशा पद्धतीने सुधारित आराखडा 10 दिवसात सादर करा असे निर्देश पुन्हा एकदा मा दिपकजी केसरकरांनी सोशल सर्विस लीग ला दिले.
“दामोदर नाट्यगृह हे शंभर वर्षे जुने एतिहासिक नाट्यगृह असून मराठी संस्कृतीच्या जडणघडणीचा जिवंत वारसा आहे. जर सोशल सर्विस लीगला जमणार नसेल तर महाराष्ट्र शासन महापालिकेमार्फत 50 कोटी रुपये खर्च करून भव्य दामोदर नाट्यगृहाची उभारणी करील पण कोणत्याही परिस्थितीत गिरणगावात अतिशय भव्य स्वरूपात दामोदर नाट्यगृह व्हावे आणि मराठी लोककला, नाट्यकलेचा वारसा जपला जावा ही शासनाची इच्छा असल्याचे मा पालकमंत्री दिपकजी केसरकर यांनी याप्रसंगी सांगितले.
मा. मंत्री महोदयांनी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही सुधारित आराखडा न सादर करता आहे तोच आराखडा सोशल सर्विस लीग पुढे रेटू पाहत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेले सहकारी मनोरंजन मंडळाचे लाईट आणि पाणी तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश मा. दीपकजी केसरकर यांनी देऊनही आज महिनाभरानंतरही सोशल चे पदाधिकारी दाद देत नाहीत हे खेदजनक आहे असे मत सहकारी मनोरंजन मंडळाचे संचालक सदस्य आणि आंदोलनाचे समन्वयक श्री. रविराज नर यांनी सांगितले.
वस्तुतः बच्चूबाई बिल्डिंग आणि दामोदर नाट्यगृह हे एकाच सामायिक भिंतीने जोडले गेलेले आहे आणि 9 मिटर चा अग्नीसुरक्षेसाठीचा रस्ता उपलब्ध होण्यासाठी बच्चूबाई बिल्डिंग च्या रहिवाशांची पुनर्विकासास संमती आवश्यक आहे. त्याशिवाय अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक रस्ता उपलब्ध होऊ शकत नाही.
तरीही रहिवाशांची संमती न घेता प्रकल्प पुढे रेटून शाळेचे विद्यार्थी, बच्चूबाई बिल्डिंगचे रहिवासी आणि नाट्यकर्मीची सुरक्षा धोक्यात घालण्याचा प्रयत्न होत आहे. म्हाडा, अग्निशमन विभाग आणि महापालिकेच्या प्लॅनिंग विभागाने या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. नाट्यगृहाच्या जागी शाळा बांधून भविष्यात नाट्यगृह होणारच नाही अशी भीती नाट्यरसिकांकडून व्यक्त केली जात आहे