सांगली – ज्योती मोरे.
“रेखा” या रवि जाधव फिल्म्स प्रस्तुत आणि रवि जाधव, मेघना जाधव निर्मित व शेखर बापू रणखांबे लिखित आणि दिग्दर्शित लघुपटाची प्रतिष्ठीत इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नमध्ये निवड झाली आहे.
गेल्या वर्षभरात रेखा हा लघुपट देशभरात अनेक प्रतिष्ठित महोत्सवात नावाजला गेला आहे. या लघुपटास नुकतेच लोकराजा राष्ट्रीय लघुपट महोत्सव 2023 मधे सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक मिळाले होते. त्याच दिवशी पुण्यातील तिसऱ्या द एम्प्टी स्पेस फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनसाठी मंदार कमलापुरकर व सच्चिदानंद टीकम यांना पारितोषिक मिळाले होते.
तर त्याच दिवशी मुंबईत झालेल्या पारंबी प्रोडक्शनच्या दुसऱ्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट “रेखा”, सर्वोत्कृष्ट लेखक व दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे, सर्वोत्कृष्ट छायांकन प्रताप जोशी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माया पवार अशी पाच पारितोषिक मिळाली होती. अशी एकाच दिवशी तीन फेस्टिवलची मिळून तब्बल सात पारितोषिक मिळाली होती.
तर कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी कोल्हापूर यांनी पुरस्कार प्राप्त लघुपटांचे स्क्रिनिंग ठेवले होते, त्यातही रेखाचा समावेश होता. 2022 मध्ये गोव्यातील इफ्फी मध्येही ती नावाजली गेली होती.
नुकतेच रेखा या लघुपटाची प्रतिष्ठीत इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ मेलबर्नमध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठीत इंडियन फिल्म फेस्टीवल ऑफ स्टुअटगार्डमधेही रेखा ही स्पर्धा विभागात निवडली गेली आहे. लवकरच याचे निकाल आपल्या हाती येतील, असे दिगदर्शक शेखर बापू रणखांबे यांनी सांगितले.