अकोला – जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा रखडलेला पिक विमा परतावा त्वरित मिळणे बाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख संदीप पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांना निवेदन सादर केले.
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा काढला होता. या विम्याची रक्कम शेतकऱ्यांनी रीतसरपणे भरलेली आहे. मात्र गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीपांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी दावे सादर केले. मात्र संबंधित कंपनीने विमा परतावा देण्याऐवजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून विमा परताव्याचे दावे टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे अपील फेटाळून लावले. त्यानंतर संबंधित कंपनीने राज्याच्या कृषी सचिवांकडे अखिल दाखल केले. त्यांनी सुद्धा कंपनीचे अपील फेटाळून लावत शेतकऱ्यांना विमा परतावा देण्याचे आदेश दिले.
तरीही कंपनीकडून शेतकऱ्यांना परतावा देण्यात आला नाही. उलट कंपनीने केंद्रीय कृषी सचिवांकडे अपील दाखल केलेले आहे. याबाबत आपण लक्ष घालून केंद्रीय कृषी सचिवांकडे या संबंधित कंपनीला योग्य समज देण्याबाबत शिफारस करावी व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचा विमा परतावा ताबडतोब मिळावा, याकरिता प्रयत्न करावे, अशी मागणी संदीप पाटील यांनी ना. अब्दुल सत्तार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
खरीप हंगाम उलटून गेला आता दुसरा खरीप हंगाम येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पैशाची गरज आहे. अशा परिस्थितीत पिक विमा परताव्याची रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. तरी याबाबत त्वरित लक्ष घालावे असेही संदीप पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.