तत्पूर्वी नागपूर खंडपीठाच्या पालक न्यायाधीशांना देणार तक्रार…
आकोट – संजय आठवले
आकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशी जुळणाऱ्या रस्त्यांची वर्षानुवर्षे सुरू असलेली बांधकामे अद्यापही पूर्णत्वास जात नसल्याने आकोट शहरातील वकील लोकांचा पारा चांगला चढला असून यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी आकोट बार रुमने सुरू केली आहे. त्याकरिता या संदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच यासंदर्भात नागपूर खंडपीठाचे पालक न्यायाधीश यांच्याकडे तक्रारही करण्यात येणार आहे.
आकोट अकोला मार्गाचे काम गेली अनेक वर्षे कण्हत कुंथत सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात तर हे काम पूर्णतः बंद होते. आताही हे काम जणू अडथळ्यांची शर्यतच आहे की काय असे होत आहे. या प्रकाराने आकोट तालुक्यातील प्रवाशांना अकोला येथे जाणे येणे म्हणजे महादिव्यच ठरत आहे. परिणामी आकोटकरांना अतिशय जिकीरीचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रकारचे व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण या मार्गामुळे अतिशय त्रस्त झाले आहेत.
यासोबतच शहरातील रेल्वे पूल ते आकोट न्यायालयापर्यंतच्या मार्गाचे बांधकामही अनेक वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्याचे मध्यभागी डिव्हायडर, शानदार पथदिवे लावण्याची योजना होती. त्याकरता हा मार्ग चांगलाच प्रशस्त करण्याचे दावेही करण्यात आले होते. याकरिता आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेतला होता. आपला हा स्वप्न मार्ग पूर्ण करण्याचे काम आपल्या लाडक्या कंत्राटदार संतोष चांडकला मिळण्याकरिता त्यांनी आपले वजनही खर्ची घातल्याची बोलवा आहे.
त्यामुळे आपले कृपानिधान आमदारांची ही स्वप्नपूर्ती कंत्राटदार संतोष चांडक नेटाने व ईमानाने करेल असे वाटत होते. परंतु आमदारांच्या ह्या स्वप्न मार्गात चांडक ने खड्डेच खड्डे तयार केल्याचे चित्र आहे. यासंदर्भात आकोट सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुलतान यांनी माहिती दिली की, या गचाळ कामामुळे संतोष चांडकला दर दिवशी ५ हजार रुपये दंड सुरू आहे. परंतु त्या दंडाच्या वसुली बाबत मात्र कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नाही.
तरीही त्याबाबत आमदार भारसाकळे काहीही बोलण्यास तयार नाहीत. हे पाहून आकोटकरांच्या संतापात आणखीनच भर पडत आहे. हा मार्ग पूर्ण होईल की नाही याबाबत आता तर स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग ही साशंक आहे. हीच अवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मासळी बाजारातून अंजनगाव कडे जाणाऱ्या मार्गाची. हे कामही आमदार भारसाकडे यांचा परमप्यारा कंत्राटदार संतोष चांडकच करीत आहे. हे कामही अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे.
वास्तविक हा मध्यप्रदेशात जाणारा राज्य महामार्ग आहे. त्यामुळे महामार्गाचे काम अखंड व्हावयास हवे. मात्र हा मार्ग निव्वळ ठिगळा ठिगळांनी जोडल्या जात आहे. काही ठिकाणी तरी या मार्गावर जीवघेणी ठिकाणे निर्माण झाललेली आहेत. परंतु त्यांची तमा ना आमदार भारसाकळेंना आहे ना त्यांच्या लाडक्या कंत्राटदार संतोष चांडकला आहे. अशा स्थितीत नियमाने बांधलेला आणि आमदारांच्या दावणीला जखडलेला सार्वजनिक बांधकाम विभाग बिचारा संतोष चांडकशी पत्रव्यवहार करून जेरीस आला आहे.
या पत्र व्यवहारांचे कागद वजन काट्यावर मोजले तर सहजच चार पाच किलो भरतील. एकीकडे या पत्रव्यवहारातून बांधकाम विभाग चांडकला “आम्ही असे करू, आम्ही तसे करू” च्या धमक्या देत आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्षात भेट झाल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन करून त्याच्या प्रकृतीची वास्तपुस्त केली जात आहे. असे प्रगाढ जिव्हाळ्याचे सोयरपन असल्याने चांडकही सार्वजनिक बांधकाम वाल्यांना दाद देत नाही.
अशा स्थितीत हे सारे मार्ग शहरात मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाशी जुळतात. या साऱ्या गलथान कारभारावर बोलण्यास कुणीच तयार नाही. त्यामुळे आता त्याचा जाब विचारण्याकरिता आकोटची वकील मंडळी पुढे सरसावली आहे. त्यांनी कायद्याची लढाई लढण्याचा मनसोबा केला आहे. या संदर्भात नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याच्या हालचालीस सुरुवात झाली आहे.
त्याकरिता आवश्यक असल्यास बार रूममध्ये ठरावही घेण्यात येणार आहे. यासोबतच नागपूर खंडपीठाचे गार्जियन जस्टीस अर्थात पालक न्यायाधीश किल्लोर यांचे कानी हा विषय घेतल्या जाणार आहे. नागपूर खंडपीठांतर्गत येणाऱ्या सर्व न्यायालयांच्या, वकिलांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी पालक न्यायाधीशांकडे आहे. त्यामुळे आकोटची वकील मंडळी आपले गार्हाणे त्यांच्यासमोर मांडणार आहेत.
नियमानुसार ह्या तक्रारीबाबत हे न्यायाधीश संबंधित यंत्रणांना तंबी देऊन विशिष्ट कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे आदेश देऊ शकतात. तसे न झाल्यास या संदर्भात ते जनहित याचिकाही दाखल करून घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे जनहित याचिकांचे कामकाज त्यांचेच न्यायालयात चालते. त्यामुळे पालक न्यायाधीशांच्या आदेशाची अवहेलना झाल्यास या बेजबाबदार यंत्रणांविरोधात आपोआपच पुरावा निर्माण होणार आहे.
त्यामुळे आकोटच्या वकिलांचे हे अतिशय महत्त्वाचे सोबतच अतिशय विचारपूर्वक उचललेले पाऊल ठरणार आहे. असा घटनाक्रम येत्या काही दिवसातच घडणार आहे. याबाबत आकोट बार रुमचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेंद्र पोटे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सोबतच या रस्त्यांसंदर्भात ज्याच्याकडे जी माहिती असेल ती त्याने आम्हाला पुरवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे याबाबत नेमके काय होते हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.