नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड, हिंगोली परभणी या तीन जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान नांदेड शहरातील अनेक नागरिक घराबाहेर येऊन रस्त्यावर आल्याचे दिसून आले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून आज दि 10 जुलै रोजी सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.
नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे