इंडिया आघाडी भक्कम होत असल्याने भाजपाला पोटशूळ. आघाड संदर्भातील चर्चा कोणी नेता पत्रकारा समोर करेल का?मुंबई, दि. २९ डिसेंबरदेशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर देशपातळीवर इंडिया आघाडी होत आहे व राज्यात महाविकास आघाडी अभेद्य आहे आणि यात वंचित बहुजन आघाडी जोडली जाणार असल्याने भितीने भाजपाला पोटशूळ उठला आहे म्हणून दिशाभूल करणारी माहिती काही सुपारीबाज पत्रकार पसरवत आहेत,
असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील समावेशासंदर्भात एका पत्रकारने सोशल मीडियावर जाणीवपूर्वक धादांत खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली आहे.
कोणीतरी पत्रकार येतो आणि मी अशी चर्चा ऐकली आहे असे सांगत सुटतो हे शक्य आहे का? आघाडी संदर्भातील महत्वाची चर्चा सुरु असताना असा कोणी पत्रकार तिथे बसू शकतो का? हा साधा प्रश्न आहे. आणि पत्रकारासमोर आघाडी संदर्भातील महत्वाची चर्चा कोणी नेता करेल का? षडयंत्र रचणाऱ्या अशा पत्रकाराने सुपारीबाजपणा करायचे सोडून द्यावे. भाजपाच्या अशा कितीही सुपाऱ्या घेतल्या तरी भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव होणार आहे त्यामुळे अशा सुपाऱ्याने काहीही फरक पडणार नाही, असेही लोंढे म्हणाले.