Monday, December 9, 2024
Homeमनोरंजनमोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित…   

मोहन जोशी यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ घोषित…   

मुंबई – गणेश तळेकर

मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषित करण्यात आला आहे. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा करण्यात आली.

मराठी नाट्य कलाकार संघ ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची अधिकृत घटक संस्था असून, गेली २५ वर्षे नाट्य परिषदेच्या सहकार्याने व्यावसायिक रंगकर्मींसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने व्यावसायिक रंगकर्मींसाठी अनेक हिताचे उपक्रम राबविण्यात येतात. 

व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या व रंगभूमीवरील सक्रिय रंगकर्मीचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ ही संकल्पना, कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी राबविण्यास सुरुवात केली.

मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस २०१४ या वर्षापासून कलाकार संघातर्फे ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एका ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मीचा सन्मान करण्यात येतो. 

या वर्षी सुद्धा हा सोहळा सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माहीम-माटुंगा येथे आयोजित करण्यात आला आहे. यात ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान सोहळ्यासह ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

तसेच सन्मानमूर्ती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखतही यावेळी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती मराठी नाट्य कलाकार संघातर्फे देण्यात आली. आतापर्यंतच्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोहळ्यांमध्ये भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी व रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ कलाकारांना मराठी नाट्य कलाकार संघातर्फे सन्मानित केले गेले आहे. 

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: