नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गणेशनगर येथील ख़ुशी हॉस्पिटलजवळ एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास मी पोलीस असल्याचे सांगून चोरट्याने त्यांच्या गळ्यातली सोन्याची चैन आणि अंगठी हिसकावून पळ काढला त्यामुळे असली पोलिसांपुढे आता नकली पोलिसास शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशालनगर पावडेवाड भागात राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी देविदास उर्फ बंडू साकळकर हे 17 मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामारी तालुका हिमायतनगर येथील शेतीकडे जाण्यासाठी निघाले होते.
दरम्यान गणेशनगर येथील ख़ुशी हॉस्पिटल जवळ दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवून मी पोलीस आहे असे म्हणत धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी हिसकावून सुमारे 65 हजाराचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.
या प्रकरणी साकळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरन 168/2024 कलम 170 भादवी कायद्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कव्हाळे हे करीत आहेत.शहरात चोरीचे प्रमाण दिवासोंदिवस वाढत आहे. या पूर्वीही पोलीस असल्याचे सांगून लुटण्याचे अनेक प्रकार शहरात व जिल्ह्यात घडले आहेत. त्यामुळे असली पोलिसापुढे नकली पोलिसांना शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.