सांगली – ज्योती मोरे
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुंग मधील मिनचे मळ्याजवळ सांगली इस्लामपूर रोडवर ट्रकच्या आडवी ओमनी गाडी घालून ट्रक चालक धीरज नेताजी वडर वय 28 राहणार वडर गल्ली इस्लामपूर आणि त्याचा भाऊ आनंदा वडर यांना लाथाबुकयांनी जबर मारहाण करत त्यांच्या खिशातून मोबाईल तसेच रोख रक्कम चोरण्याचा प्रकार घडला होता.
सदर घटने संदर्भात तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम तसेचअप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डूबुले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार तपास चालू असताना खास बातमीदार मार्फत, हे आरोपी वाळवा तालुक्यातील कोरेगाव मध्ये मगदूम गल्लीत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता, एम एच 10 सीएम 1167 या पांढरा रंगाच्या ओमनी गाडीत तिघेजण असल्याचे आढळून आले.
स्वप्निल बाबासो कदम , वय 31,राहणार मगदूम गल्ली कोरेगाव, अक्षय कृष्णात पाटील वय 26 राहणार हनुमान मंदिरासमोर कोरेगाव, दीपक राजाराम जाधव वय 25 राहणार जाधव गल्ली बहादूरवाडी तालुका वाळवा, आदींचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून गाडीत ठेवलेला ओपो कंपनीचा साधारण आठ हजारांचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजार रुपये किमतीची ओमनी गाडी असा एकूण 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींसह मुद्देमाल सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, बिरोबा नरळे, सागर लवटे, अनिल कोळेकर, विक्रम खोत, मेघराज रुपनर ,निलेश कदम, संतोष गळवे कुबेर खोत आदींनी केले.