कृषि विद्यापीठाचा शेतकरी शास्त्रज्ञ संवाद उपक्रम!
अकोला – संतोषकुमार गवई
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृद विज्ञान विभागातील अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्प व चंद्रभागा फार्मर्स प्रोडूसर कंपनी हिरदामल यांचे संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यातील कालापाणी येथे दारशिंबे यांचे शिवारात परिसरातील विविध गावांमधून आलेल्या एकूण 20 कपाशी व 25 मिरची उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांसमवेत शेतकरी शास्त्रज्ञ संवाद व खत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी सर्वप्रथम शेतकऱ्यांना दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांच्या वापरा बाबत मृद विज्ञान विभागाचे कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ प्रशांत सरप यांनी सखोल मार्गदर्शन केले. तदनंतर संशोधन सहयोगी मयूर सरोदे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा याबाबत शेतकऱ्यांना अवगत केले.
चंद्रभागा लिमिटेडचे संचालक प्रवीण जामकर यांनी दुभाषकाचे कार्य केले. या वेळी दुय्यम अन्नद्रव्य गंधक युक्त बेन्टोनाईट सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त द्रवरूप पी डी के व्ही ग्रेड 2 या खतांचे वाटप अनुक्रमे कपाशी व मिरची उत्पादक शेतकरी बांधवांना करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून तसेच संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनातून, विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर यांच्या पुढाकाराने व प्रकल्प प्रमुख डॉ. संदीप हाडोळे यांचे नियोजनात सदर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सर्व शेतकऱ्यांचे मातीचे नमुने गोळ्या करण्यात आले असून सदर नमुन्यांचे कृषी विद्यापीठातील सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रयोगशाळेमध्ये मृदेमधील विविध 17 घटकांचे रासायनिक पृथक्करण करण्यात येणार आहे व त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप विनामूल्य करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कृषी सहाय्यक श्रेयस नांदुरकर, कुशल मदतनीस प्रज्वल भडके यांनी सहभाग नोंदवला.