पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील ग्राम चतारी येथील सैनिक संदीप भानुदास मुळे सिक्कीम येथे भारतीय संरक्षण विभागात नायक म्हणून सैनिक पदावर कार्यरत आहे.आपलं छोटसं हक्काचं स्वप्नातील घर असावं असं प्रत्येक जण आपल्या उराशी स्वप्न बागळत असतं.
अशाच प्रकारचं स्वप्न उराशी बाळगून संदीपने आपल्या मुळगावी चतारी येथे एक छोटसं घर बांधून सेवानिवृत्ती मिळाल्यावर परिवारासह आनंदाने तेथे राहू असं वाटलं.परंतु गावातील गैर अर्जदार देविदास गणपत मुळे रा चतारी याने सैनिकाच्या घरा समोरच ग्रामपंचायतच्या शासकीय जागेमध्ये टिनपत्रा शेड बांधून अतिक्रमण केले.
केलेल्या अतिक्रमणामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या घरात जाण्या-येण्याची खूप अडचण निर्माण झाली आहे.हे अतिक्रमण हटविण्यासाठी सैनिक पत्नी व आप्तेष्ट यांनी 9 जून 2023 ला ग्रामपंचायत चतारी येथे तक्रार दिली होती.या नंतर वारंवार ग्रामपंचायत चतारी,पंचायत समिती पातुर,तहसील कार्यालय पातूर जिल्हा परिषद अकोला आदी ठिकाणी तक्रार अर्ज देऊन सुद्धा प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
शेवटी त्रस्त होवून सैनिक संदीप भानुदास मुळे यांनी लोकशाही मार्गाने गटविकास अधिकारी पंचायत समिती पातुर यांना येणाऱ्या दोन दिवसांत अतिक्रमण न हटविल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे देशाच्या सीमेवर देशातील नागरिकांसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या संरक्षण विभागातील सैनिकाला आपल्या हक्कासाठी भांडताना मात्र लोकशाही मार्गातून उपोषणाचं हत्यार उपसावं लागते ही घटना खुप दुर्दैवी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.