रामटेक – राजु कापसे
महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक,पालक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात आले.
यामध्ये मूल्यांकन समिती द्वारा शालेय परिसर, वर्ग सजावट, शाळा सजावट, वृक्षारोपण व संवर्धन, बोलक्या भिंती विद्यार्थी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, परसबाग, मेरी माटी मेरा देश उपक्रम, शालेय बचत बँक, नवभारत साक्षरता अभियान, महावाचन चळवळ, विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, स्वच्छता मॉनिटर किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन वर्ग, आर्थिक साक्षरता, स्वयं रोजगाराभिमुख कौशल्य आधारित व्यवसाय शिक्षण,
आरोग्य तपासणी, तंबाखूमुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, शाळा विकासात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहभाग इत्यादी घटकांवर मूल्यांकन करण्यात आले. या अभियानासाठी शाळांची दोन गटात विभागणी करण्यात आली.
पहिला गट शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा; दुसरा गट उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा. रामटेक तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण १५२ शाळांपैकी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिलेवाडा येथील शाळेने सर्वाधिक गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी पात्र ठरून जिल्हास्तरावरील द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
शाळेच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे. जयसिंग जाधव गट विकास अधिकारी, विजय भाकरे गटशिक्षणाधिकारी, शालिनी रामटेके शिक्षण विस्तार अधिकारी, प्रकाश महल्ले केंद्रप्रमुख, विकास गणवीर केंद्रप्रमुख या सर्वांनी शिक्षकांचे,शाळा व्यवस्थापन समितीचे व ग्रामपंचायतचे अभिनंदन केले. याकरिता मुख्याध्यापक जनार्दन ठोकणे,
पदवीधर विज्ञान शिक्षिका अंजली गणवीर, सहायक शिक्षक रणभिड मोटघरे, विलास बागडे, सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमा ढोक, उपसरपंच गोपिचंद खडसे, ग्रामपंचायत सचिव विद्यासागर कांबळे, जयश्री खेवले, रेखा डोले, सुनीता तुरणकार, मंगला चुधरी, रोहित खडसे, विद्यार्थी,पालक,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे विशेष सहकार्य लाभले.