Saturday, July 27, 2024
spot_img
Homeराज्यआमदार भारसाखळे यांना लोकार्पणाची घाई…पण मंत्री येण्यास राजीच नाही…हिरमुसले भारसाखळे स्वतःच फीत...

आमदार भारसाखळे यांना लोकार्पणाची घाई…पण मंत्री येण्यास राजीच नाही…हिरमुसले भारसाखळे स्वतःच फीत कापणार?…

आकोट – संजय आठवले

जुनी कात टाकून नवीन रूप धारण केलेल्या आकोट पालिकेच्या इमारतीचे लोकार्पण करणेकरिता आमदार भारसाखळे यांची लगबग सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच हा सोहळा उरकण्याकरिता त्यांनी पालिकेसमोर चक्क मंडपाचा ढाचाही उभा करून ठेवला आहे.

परंतु स्वतःच्याच कामात बिझी असलेल्या मंत्र्यांनी त्यांना नकार कळविल्याने हिरमुसलेल्या आमदार भारसाखळे यांना कोल्हा काकडीस राजी या न्यायाने ह्या लोकार्पणाची फीत स्वहस्तेच कापावी लागणार असल्याचे दिसत आहे.

आकोट पालिकेची इमारत बरीच जुनी व शिकस्त झाल्याने काँग्रेसच्या कार्यकाळातच या इमारती संदर्भात सर्व सोपस्कार पार पाडले गेले. त्यानंतर ह्या इमारतीच्या तळमजल्याचे काम सन २०११ मध्येच पूर्ण करण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांचे हस्ते या इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ह्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम प्रस्तावित होते. अशातच राज्यात सत्तापालट झाला. परंतु या इमारतीचे काम मात्र सुरूच होते.

अखेर २०२४ चा मार्च उजाडता उजाडता हे काम पूर्णत्व पावले. परंतु त्याचवेळी लोकसभा निवडणुक आचारसंहितेने आपली चाहूल दिली. त्यामुळे कोणत्याही कामाचे श्रेय घेऊन तिथे आपली पाटी लावण्यात तरबेज असलेल्या आमदार भारसाकळे यांना आचारसंहितेपूर्वी लोकार्पणाचा बार उडवावयाचा होता. त्या दृष्टीने त्यांची लगबगही सुरू झाली. इतकी कि, त्यांनी पालिकेच्या मैदानात चक्क मंडपाचा ढाचाही तयार करावीला. हेतू हा कि, लोकार्पणाकरिता कोणत्याही मंत्र्याची तारीख मिळताच जराही वेळ वाया न घालविता लगेच सोहळा साजरा करता यावा.

त्यामुळे लोकार्पणाकरिता वास्तू, मंडप यांचे सह भारसाखळेही गुडघ्याला बाशिंग बांधून अगदी सज्ज झाले आहेत. परंतु लोकार्पणाची फीत कापणेकरिता मात्र मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना जराही सवड नाही. सततचे दौरे आणि अन्य वेळी लोकसभा निवडणुकीची तयारी ह्यातच तिघेही २४ तास व्यस्त आहेत. त्यामुळे एखादा मंत्री तरी मिळावा म्हणून भारसाखळे ‘आय माय पुरी’ म्हणत मंत्र्यांकडेही गेले. परंतु तेही व्यस्त असल्याने तेथूनही नकार घंटाच ऐकावयास मिळाली.

ह्यातच खबर अशी आहे कि, भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या मनातून भारसाखळे उतरलेले आहेत. त्यांचे जागी दुसरा मोहरा आणण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे आपला वेळ वाया घालवून त्यांना मोठे करण्यात फडणवीस यांना स्वारस्य राहिलेले नाही. म्हणून ते येत नाहीत.

भाजपच्या आमदाराकडे स्वतः फडणवीस जात नाहीत, म्हणून शिंदे पवार हेही येणार नाहीत. नुकतेच आकोटात उपजिल्हा रुग्णालय व प्रशासकीय इमारतीचे सोहळे पार पडले. त्यावेळीही हेच कारण असल्याने शिंदे पवार फडणवीस यांनी आकोटला येणे टाळले. अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने नामदार विखे यांना नाईलाजाने यावे लागले होते.

परंतु यावेळी त्यांचाही येण्याचा मानस नसल्याचे दिसत आहे. सोबतच अन्य मंत्री आपापल्या मतदारसंघात व्यस्त झालेले आहेत. त्यामुळे येथे येण्यास त्यांनीही असमर्थता व्यक्त केली आहे. वास्तविक कोणत्याही निमित्ताने का होईना शिंदे फडणवीस किंवा पवार यांना आकोटला आणण्यात भारसाखळे यांचे हेतू फार वेगळे होते.

त्यातील पहिला असा कि, आकोट येथे आल्यावर सोहळ्याच्या अनुषंगाने या लोकांची भाषणे होतील. त्यावेळी शिष्टाचार म्हणून या लोकांना आपली प्रशंसा करावीच लागेल. त्यामुळे आपण किती कार्यतत्पर आणि विकासपुरुष आहोत हे आकोटवासीयांचे मनावर बिंबविले जाईल. म्हणजे मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांचे मुखाने आयताच आपला प्रचार होईल.

दुसरा मनसुबा असा कि, यावेळी आपल्याला भाजपची उमेदवारी मिळत नाही, याची पुरेपूर जाणीव भारसाखळे यांना आहे. परंतु मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांना आणून त्यांचे मुखाने आपली प्रशंसा झाल्याने त्यांचा मोठा कार्यभाग साधला जाणार आहे. तो असा कि, आपली उमेदवारी भाजपने नाकारल्यास आपण लायक असल्यावरही आपणास डावलले असा प्रचार करणे त्यांना सोपे जाणार आहे.

आणखी असे कि, आपण विकासपुरुष आणि कार्यतत्पर असल्याची ग्वाही स्वतः मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी दिल्याचा प्रचारही त्यांना करता येणार आहे. त्यामुळेच भारसाखळे आतून अपक्ष लढण्याचीही तयारी करीत आहेत. भारसाखळे यांचे हे डाव फडणवीस यांना पुरते ठाऊक आहेत. त्यामुळेच आपल्या येण्याचा कोणताही लाभ भारसाखळे यांना होणार नाही याची पुरेपूर दक्षता फडणवीस घेत आहेत.

अशातच ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला येथे येत आहेत. त्यानिमित्ताने तेथे भाजपचा कुंभमेळाच लागणार आहे. मनातून उतरलेले असले तरी शिष्टाचार म्हणून भारसाखळे तिथे उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी आचारसंहिते पूर्वी कोणी फित कापणारा गावतो का? याची चाचपणी भारसाखळे करणार आहेत.

परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे होणे अशक्यप्राय आहे. परिणामी “चमचमीत मेजवानी मिळत नसली तर घरच्याच भाजी भाकरीवर भागवू” या न्यायाने एकीकडे मंत्र्यांचा नकार आणि दुसरीकडे आचारसंहितेची भीती या दोहोंचा सुवर्ण मध्य साधावयाचा असल्यास भारसाखळे यांनाच ही लोकार्पणाची फीत कापावी लागणार असल्याचे दिसत आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: