अकोला – संतोष गवई
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नियुक्त कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचा संच (भांडी) विनामूल्य वितरित करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते रविवारी (11 फेब्रुवारी) नियोजनभवनात काही कामगार बांधवांना संच देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सहायक कामगार आयुक्त डॉ. रा. दे. गुल्हाने आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.
मंडळाद्वारे योजनेसाठी नियुक्त कंत्राटदार मफतलाल इंडस्ट्रीज हे असून, स्टार एन्टरप्रायजेस, बी. के. चौक, दर्गा रोड, श्री फर्निचरजवळ, शिवणी, एमआयडीसी-4, अकोला असा त्यांचा पत्ता आहे.
त्याठिकाणी कामगारांनी विहित नमुन्यातील अर्ज छायाचित्र, हमीपत्र, स्वयंघोषणापत्र, नोंदणी, नूतनीकरण पावती, आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे जोडून सादर करावा व गृहोपयोगी वस्तूंचा संच प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन डॉ. गुल्हाने यांनी केले.