दुसरा दिवस कमालीचा उत्साही, राज्यातून अनेक पत्रकार या आंदोलनात
रामटेक – राजु कापसे
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्हाँईस मिडीयाने पुकारलेल्या लाक्षणिक उपोषन सुरु असतांना जो दुसऱ्यांचे प्रश्न मांडतो त्या पत्रकारांच्या प्रश्नाला वाचा फुटायलाच हवी. आम्ही तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आणि विधिमंडळात पत्रकारांचा आवाज बुलंद करू, असे आश्वासन विविध मतदारसंघातील आमदारांनी दिले आज आंदोलनाचा दुसरा दिवस कमालीचा उत्साही होता. राज्यातून अनेक पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात पुकारलेल्या लाक्षणिक उपोषण मंडपाला आज गुरुवारी विविध मतदारसंघातील आमदारांनी भेटी दिल्यात. गडचिरोली – चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते, बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक, विधानपरिषदेचे आमदार रामदास आंबटकर आदी आमदारांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली.
या सर्व लोकप्रतिनिधींना व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक दाद देत पत्रकारांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी दिली. केंद्र सरकारकडे सुद्धा हे प्रश्न मांडण्याचे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. कवी लोकनाथ यशवंत यांनीही उपोषण मंडपाला भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला.
पटोले, वडेट्टीवार, दानवे, बच्चु कडु आदित्य ठाकरे यांनीही दिला विश्वास
व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विधिमंडळातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा केली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत पत्रकारांच्या मागण्या लावून धरण्याचे आश्वासन दिले.
उत्साह आणि घोषणा
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांचा उत्साह दांडगा होता. पत्रकारांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी आज सर्व पत्रकारांनी घोषणा दिल्या. या घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.