शिक्षणानेच ध्येय प्राप्ती शक्य – समतादूत राजेश राठोड
रामटेक – राजु कापसे
दिनांक 07 नोव्हेंबर 2023 रोजी जि.प.उच्च प्राथमिक शाळा,आजनी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प,तालुका रामटेक यांच्या वतीने विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. बाबासाहेबांचे देशासाठी योगदान अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी कसा असावा ? याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या जिज्ञासू प्रवृत्ती व कठोर परिश्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी कारण केवळ शिक्षणातूनच ध्येय प्राप्ती होऊ शकते असे मत रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी व्यक्त केले.
07 नोव्हेंबर 1900 मध्ये सातारा येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात सद्याचे प्रतापसिंग हायस्कूल, सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जिवनात प्रवेश घेतला होता.त्याचे स्मरण व चिंतन व्हावे व विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षात्मक जीवनातून प्रेरणा घ्यावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे असे राठोड यांनी सांगितले.प्रास्ताविक भाषण शिक्षक संजय निमजे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकिरण दमाहे होते तर संचालन सुप्रसिद्ध योगाचार्य नामदेव राठोड यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विद्यार्थीनी अनुष्का लिल्हारे हिने आपले सुंदर शब्दात विचार मांडले.
संविधान उद्देशिकेची प्रत देऊन शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते अनुष्का लिल्हारे हिचे अभिनंदन करण्यात आले.आभार शिक्षक गणराज नागपूरे यांनी मानले.यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षक सविंद्र मेश्राम तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण निबंधक इंदिरा अस्वार जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी मार्गदर्शन केले.