न्युज डेस्क : पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या मराठ्यांच्या, आता बरबाद होऊ द्यायच्या नाही…असे मराठा बांधवांना सांगणारे मनोज जरांगे पाटील यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही गावांनी कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश करू देणार नाही, जो पर्यंत मराठा आरक्षण मिळणार तो पर्यंत ही बंदी असणार आहे. गावपातळी पासून सर्वत्र आंदोलनाचे लोण पसरले आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांविरूद्ध कमालीचा असंतोष दिसून येत आहे.
मराठा आरक्षणावरून गावातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यातील अनेक गावात नेत्यांना गावबंदी केली आहे. तर अनेक गावातून नेत्यांची हकालपट्टी सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील वावना गावातून भाजपच्या शिष्टमंडळाची हकालपट्टी केल्याची माहिती समोर येत आहे. येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मतदानवर बहिष्कार आणि नेत्यांना गावबंदी कायम राहील असं गावकऱ्यांनी म्हटलय. तर अंबड तालुक्यातील रोहिलागड गावात पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन करण्यासाठी गेलेले भाजप आमदार नारायण कुचे यांना ग्रामस्थांच्या व मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एक मराठा, लाखमराठा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आमदारांना गावातून जाण्यास भाग पाडले. यावेळी काही काळ रोहिलागड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर आ. कुचे यांनी गावातून काढता पाय घेतला.
आंतरवली येथे आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. एक महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना दिलं आहे. परंतु, या एक महिन्यात मी आंदोलन सुरूच ठेवेन असं जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहे. या दौऱ्यांमधून ते मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याचं काम करत आहेत.
येत्या 14 तारखेला आंतरवली येथे मराठा समाजाची मोठी सभा आयोजित केली असून मराठा समाजानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.