Saturday, November 23, 2024
Homeगुन्हेगारीआकोट | सुरक्षाविरहित एअरटेल टॉवर वरून पडून विवाहित तरुणाचा मृत्यू….

आकोट | सुरक्षाविरहित एअरटेल टॉवर वरून पडून विवाहित तरुणाचा मृत्यू….

आकोट- संजय आठवले

आकोट येथील इफ्तेखार प्लॉट भागात राहणाऱ्या युवकाचा एअरटेल टॉवर वरून पडून मृत्यू झाल्याने ह्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.२६ वर्षीय या तरुणाचे नाव रियाज अली मोहम्मद अली असून तो घरबांधणीचे काम करायचा. दोन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला असून त्याला सहा महिन्यांची एक कन्या आहे. निर्व्यसनी असलेला हा तरुण पक्का नमाजी होता. घरबांधणीचे काम करणारे आकोट शहरातील मुस्लिम मजूर दर सोमवारी सुट्टी घेतात. त्यानुसार रियाजही सोमवारी घरीच होता. दुपारी नमाज पठणाचे निमित्य सांगून तो घराबाहेर पडला. त्याच्या घराच्या बाजूलाच एअरटेल चा अवाढव्य टॉवर उभारलेला आहे.

ह्या टॉवरच्या बाजूला ईकरा स्कूल नामक विद्यालय आहे. त्यामुळे या टॉवर जवळील मैदानात शाळकरी विद्यार्थी नेहमीच खेळत असतात. त्या समयी रियाज त्या टॉवरजवळ गेला. आपल्या पायातील चप्पल काढून तो सरळ टॉवरवर चढला. आणि वीस ते पंचवीस फूट चढल्यावर तो वरून खाली पडला. तिथे खेळत असलेले काही शाळकरी विद्यार्थी रियाजने स्वतः खाली उडी घेतल्याचे सांगतात. इतक्या उंचावरून खाली पडल्याने रियाजचा जागीच मृत्यू झाला. तिथे खेळणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी त्याचे घरी जाऊन ही वार्ता दिली. कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब शासकीय रुग्णालयात नेले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रियाज निर्व्यसनी आणि नमाजी असल्याने त्याचा घरी किंवा बाहेर कुणाशीही काहीच वाद नव्हता. त्यामुळे त्याच्या अशा वर्तनाने आश्चर्यमिश्रित हळहळ व्यक्त होत आहे.

सोबतच सदर टॉवरबाबत संतापही व्यक्त होत आहे. याचे कारण म्हणजे या टॉवरच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. किंवा टॉवरच्या सुरक्षेकरिता कुणी रखवालदारही ठेवलेला नाही. त्यामुळे अनेकदा या मैदानात खेळणारे शाळकरी व अन्य विद्यार्थी या टाॅवर वर चढतात. कधीतरी एखादी समजदार व्यक्ती तेथून गेली तर ती ह्या मुलांना दरडखवून तेथून बाजूला करते. असे नेहमीच घडते. त्यामुळे ह्या टॉवरमुळे कधीतरी असा अपघात घडेल अशी आशंका तेथील रहिवाशांना होती. दुर्दैवाने रियाजच्या ह्या मृत्युने ती आशंका ठरी ठरली आहे. त्याने मोकळ्या मैदानात व शाळेच्या नजीक असलेला हा टॉवर स्थानिक रहिवाशांकरिता मोठा धोकादायक बनला आहे. रियाजच्या या मृत्यूने शहरातील ठिकठिकाणी उभारलेल्या विविध कंपन्यांच्या टॉवर्सभोवती सुरक्षेची व्यवस्था अथवा तेथे सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कारण शहरातील एकाही टॉवरच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल, पालिका अथवा पोलीस विभागाने खबरदारी घेऊन या संदर्भात संबंधित कंपन्यांना तंबी देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे शहरातील टॉवर्सभोवती कोणतीही सुरक्षा नसल्याने या टॉवर्सवर झेंडे बांधल्याने धार्मिक तेढही निर्माण होण्याची शक्यता आहे. बरेचदा असे घडल्यावर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन अशी प्रकरणे मिटवलेली आहेत. त्यामुळे शहरातील टॉवर्सबाबत संबंधित विभागांनी गंभीरतेने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: