जी कामे ग्राम पंचायतींच्या अधिकारात येतात अशा कामांची प्रशासकीय मंजूरीचे पत्र जिल्हा परिषद व पंचायत समिति सदस्य जिल्हा परिषद व पंचायत समिति कार्यालयामधून नेत असल्याने हा प्रकार त्वरित न थांबल्यास सरपंच संघटना करणार तीव्र आंदोलन……..
गोंदिया : राजेशकुमार तायवाडे
स्वच्छ भारत मिशन, दलित वस्ती, तांडा वस्ती, नरेगा व इतर कामेजी ग्रामपंचायतींच्या अधिकारात येतात, अशा कामांची प्रशासकीय मंजुरी तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयातून घेऊन जातात. हे एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणणे आहे.
हा प्रकार त्वरित न थांबविल्यास या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा तिरोडा तालुका सरपंच संघटनेसह गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेने दिलेला आहे.
तिरोडा तालुक्यातील सरपंच संघटनेची सभा नुकतीच पंचायत समितीच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष विनोद लिल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला तिरोडा तालुक्यातील सरपंच संघटनेचे सचिव शिशुपाल रहांगडाले, कोशाध्यक्ष श्यामराव बिसेन, निशा बावनकर, लक्ष्मी ठाकरे, प्रीती भांडारकर, झेगेकर, सुरेंद्र नागपुरे, प्रकाश ठाकरे, शिवकुमार शेंडे, स्वाती चौधरी, शरणागत, कांबळी, मार्गदर्शक राजू चामट व सरपंच उपस्थित होते.
या बैठकीत सरपंच संघटनेच्या विविध मागण्यांबाबत आमदार महोदय विजय रहांगडाले यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते अनेक विषयांवर ठराव मंजूर करण्यात आले.
निधी वाटपाबाबत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिति सदस्यांचा होणारा हस्तक्षेप हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतीच्या अधिकारात असणारा निधी स्वतःच्या कामासाठी वापरत असल्याची ओरड केली जात आहे.
दलित वस्तीपासून नरेगाच्या सर्वच कामांत जिल्हा परिषद व पंचायत समिति सदस्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. एकीकडे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक पातळीवर अधिक महत्त्व देऊन तिला सक्षम बनवण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिति सदस्यांचा अतिरेकी हस्तक्षेप वाढला आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, तर त्या निधीवरही जिल्हा परिषद व पंचायत समिति सदस्यांचा डोळा असल्याची ओरड या सरपंच संघटना बैठकीत करण्यात आली. दरम्यान, याबाबत तक्रार करणार असल्याची चर्चा सरपंच संघटनेने केली आहे. हे असेच सुरू राहिले तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.