Thursday, September 19, 2024
Homeराज्यचौघान ते डोंगरी वस्तीतील विद्यार्थी व नागरिकांचा संघर्ष केव्हा मिटणार..?

चौघान ते डोंगरी वस्तीतील विद्यार्थी व नागरिकांचा संघर्ष केव्हा मिटणार..?

जगण्यासाठी गावातील नागरिकांचा संघर्ष, जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास…

रामटेक – राजु कापसे

रामटेक मधील चौघान ते डोंगरी आणि महाराजपूर, मुकनापूर, व पवनी, देवालापर वस्तीतील नागरिकांना नदीच्या वाहत्या पाण्यातून वाट काढावी लागतेय. यांच्याकडे स्थानिक आमदार व प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. गावातील विद्यार्थी व नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. डोंगरी गावातील नागरिक सुर नदीच्या वाहत्या पाण्यातून दूध घेऊन जातात. दररोज दूध ते डेरीला घेऊन जातात मात्र हे दूध घेऊन जाण्यासाठी त्यांना दररोज नदीच्या वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

आमदार आशिष जयस्वाल यांच्या दुर्लक्षपणा स्वतःच्या व्यवसायाच्या स्वार्थासाठी खिंडसी डॅम भरून ठेवला त्यामुळे चौघान ते डोंगरी सुर नदी वरील पुलावरून पाणी वाहत आहे अशा परिस्थितीत शाळेतील मुलांना शेतकऱ्यांना नोकरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे प्रसंगी अपघात सुद्धा होण्याची संभावना आहे.

प्रदीर्घ काळापासून आमदार पदाचा कालावधी असताना सुद्धा नवीन पुलाचे काम सुद्धा केले नाही. या पुलावरून डोंगरी, महाराजपूर मुकणापूर, तसेच दररोज पवनी, देवलापार कडे जाणारे रोजचे कर्मचारी शेतकरी वर्ग मजूर वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे संतप्त झालेले सर्व नागरिक आमदाराच्या स्वार्थ हेतू कामकाजावर नाराज आहेत.

नदीवर पूल बांधण्याचं फक्त आश्वासन

सुर नदीच्या काठावर असलेलं चौघान गाव व नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वस्त्या. याच वस्त्यांवरील लोकांना जर गावात यायचं असेल तर सुर नदी रोज ओलांडावी लागते. अनेक वेळा स्थानीक आमदार आणि प्रशासनाकडे नदीवर पूल बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली, मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळालं नाही.

चौघान व डोंगरी वस्तीतील नागरिकांचा संघर्ष केव्हा मिटणार?

येणारा काळ हा निवडणुकांचा आहे मग विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत मतदानासाठी राजकीय नेते याच पाण्यातून या चौघान वस्ती आणि डोंगरी वस्तीवर येणार आहेत. तेव्हा राजकीय नेत्यांना इथेच नक्की जाब विचारण्याची तयारी गावकऱ्याची आहेत. चौघान , डोंगरी आणि महाराजपूर वस्तीतील नागरिकांचा संघर्ष केव्हा मिटणार हे पाहावं लागेल.

तुडुंब भरलेला खिंडसी डॅम त्यामुळे शेकडो शेतकरी शेतीपासून वंचित झालेले असून त्यांच्या मालकी हक्काचे शेती सुद्धा डुबलेली आहे तसेच जनावरांना चाराला जागाही उरली नाही त्यामुळे अर्धा किमतीमध्ये जनावर विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाच्या धंद्यावर तो व्यवसाय होता तो सुद्धा आमदाराने व्यक्तिगत स्वार्थामुळे त्यांच्या रोजगार हिरावला गेला. त्यामुळे संतप्त नागरिक स्थानिक आमदाराच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्याची तयारी दर्शवलेली आहे.

विद्यार्थी व डोंगरी गावातील व इतर नजीकच्या गावातील नागरिकासह डॉ. राजेश ठाकरे यांनी पुलाची पाहणी केली, अतिशय विदारक परिस्थितीत विद्यार्थी व शेतकरी आहेत त्यामुळे शासन तसेच प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा असे आवाहन या संदर्भात निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यांना डॉ. राजेश ठाकरे यांनी दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: