पत्रपरिषदेत भाजप माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचा घनाघात
रामटेक – राजु कापसे
विधानसभा निवडणूक अवघ्या एक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आचारसंहिता केव्हाही लागू शकते अशा वेळी आज दिनांक ५ सप्टेंबरला शहरातील दीप हॉटेल येथे पार पडलेल्या पत्र परिषदेत भाजप माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी ‘ महायुतीने बंडखोर उमेदवारास निवडणुकीची तिकीट दिल्यास अशा उमेदवाराला आमचा पाठिंबा राहणार नाही तसेच आम्ही अशा उमेदवाराचे काम करणार नाही ‘ असे स्पष्टपणे सांगितले.
भाजप माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांची पत्र परिषद आज दिनांक ५ सप्टेंबरला शहरातील दीप हॉटेल येथे दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान पार पडली. यात रेड्डी संतापुन बोलत होते. यावेळी भाजपचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे, नमो नमो मोर्चाचे अध्यक्ष विजय हटवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या आमदाराने बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली तेव्हा भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला, तेव्हा आता अशा बंडखोर उमेदवाराला महायुतीने रामटेक विधानसभेची तिकीट दिली तर आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होऊ तसेच अशा उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही असे माजी आमदार रेड्डी यांनी सांगितले तसेच या व्यक्तीने एवढ्या वर्षांमध्ये रामटेक विधानसभेत किती विकासकामे केली हे सुद्धा पक्षाने पाहिले पाहिजे. त्यांनी रामटेकसाठी असे काय केले आहे ?
असा सवाल उपस्थित करीत पुढे बोलताना रेड्डी म्हणाले की विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात एम आय डी सी येणार होती ती कुठे आहे, पांधन रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे झाली पण ती सर्व निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहे. रामटेकची तसेच अंबाळाची एस.टी.पी. झाली नाही. जनतेच्या विकास कामाबाबद विद्यमान लोकप्रतिनिधी फेल आहेत असा कडाडून घणाघात माजी आमदार रेड्डी यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर केला.
तसेच येथे विरोधी पक्षात तेवढा दम नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे याच बैठकीला उपस्थित असलेले भाजप नागपुर जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत ‘ युती चा धर्म न पाळणाऱ्या उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही, षडयंत्राचा बदला आम्ही घेणारच, अशा लोकप्रतिनिधीला पुरस्कार देतांना वरीष्ठांकडून रामटेक विधानसभा मतदार संघातील विकास कांमाचा आढावा का घेण्यात आला नाही ‘ असे सांगितले.
त्याचप्रमाणे बैठकीला उपस्थित नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांनी ‘ ज्या व्यक्तीने मागे म्हणजेच गेल्या विधानसभा निवडणुकीत गद्दारी करून भाजपाच्या उमेदवाराचा पाडले अशा व्यक्तीचे काम आम्ही करणार नाही, भाजपा चा उमेदवार राहील तरच आम्ही सर्व मिळून काम करू असे सांगितले.
पत्रपरिषदेला माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, नमो नमो मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, भाजप नागपुर जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे, माजी न. प. उपाध्यक्ष आलोक मानकर, शहर अध्यक्ष उमेश पटले, दिगांबर वैद्य, करीम मालाधारी, नंदु कोहळे आदी. उपस्थित होते.