नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील नागणी,येसगी सगरोळी येथील वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्याच्या नावाखाली वाळूचे उत्खनन मोठया प्रमाणात चालू असल्याने दररोज मोठया अवजड वाहनाने वाळूची वाहतूक होत असून सगरोळी येथील डेपो क्रमांक दोनवरून वाळू भरून निघालेल्या एका हायवा गाडीने देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावार सागरोळी बसस्टॉप जवळ एका मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झालाआहे.वाळूवाहतुकी संदर्भात अनेकदा वृत्त प्रसारित करूनही प्रशासन गाफिल कसे असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वाळू डेपो क्रमांक दोनवरून वाळूने भरलेल्या हायवाच्या धडकेने दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना रविवार दि. २६ मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सगरोळी बसस्टॉप जवळ घडली आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे सध्या दोन वाळू घाट डेपो चालू आहेत.
वाळू डेपो क्रमांक दोन मधून भरून निघालेले हायवा क्रमांक एम एच ०४ एफ.जे.९७०९ हे सगरोळी येथून देगलूर कडे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक टी.एस.१६ इ.वाय. ८६७८ ला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी वरील मोईन वजीरसाब शेख वय (३५ )राहणार हिप्परगा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार वय (२५ )रा. सगरोळी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.बिलोली तालुक्यात सध्या वाळू डेपोच्या नावाखाली शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत ठेकेदार मंडळी रात्रंदिवस अवैधरित्या वाळूचे उत्खनन करीत याकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.