नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील कांगठी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शेषराव वाघमारे हे उंचीने अवघ्या साडेतीन फुटाचे असून दिव्यांग असलेले शेषराव वाघमारे हे उच्चशिक्षितआहेत. त्यांना बिलोली तालुक्यातील समस्यांची जाणीव असून ते गोरगरीब जनतेची कागदपत्रे, प्रमाणपत्रे यासह दिव्यांगासाठी काम, संजय गांधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब निराधार महिलांना मदत करणे या सारखी अनेक सामाजिक कामे शेषराव वाघमारे करतात. त्यामुळे मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे मनोगत आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले आहे.
आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने देगलूर-बिलोली मतदारसंघात दररोज नवनवीन इच्छुकांची संख्या वाढत आहे. गेली पाच वर्षे मतदासंघात न दिसणारे इच्छुक आता मी कसा श्रेष्ठ, मी पक्षात जुना,मी एकनिष्ठ पक्षाने मलाच संधी द्यावी असे सोशलमीडियाच्या माध्यमातून म्हणत पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत.
सर्वच पक्षातून इच्छुकांची वाढती संख्या पाहता प्रत्येकालाच आपण आमदार व्हावे असे वाटत आहे. त्यामुळे इच्छुकांची वाढती संख्या पाहता दिव्यांग असलेल्या शेषराव वाघमारे कांगठीकर यांनी हि आपली ईच्छा व्यक्त केली आहे. वाघमारे यांचे म्हणणे आहे की आजपर्यंत निवडून दिलेल्या कोणत्या लोकप्रतिनिधीने मतदारसंघाचा विकास केला नाही.आमदार मोहदयांना फोनद्वारे संपर्क केला तर ते उचलत नाहीत. आजी माजी आमदारांनी व येथील प्रस्थापित लोकप्रतिनिधीनी मतदारसंघाचा म्हणावा तेवढा विकास केला नाही.
आज सुशिक्षित बेरोजगाराना नोकरीच्या शोधात मोठया शहरात जावे लागते, उच्चशिक्षणासाठी विविध शहरात जावे लागते, मतदासंघात उद्योगधंदे नसल्यामुळे इतर ठिकाणी मतदारसंघातील लोकांना जावे लागते. कोणत्याही पक्षाने माझ्या सारख्या दिव्यांगास संधी दिल्यास चांगल्या उमेदवारांपेक्षा जास्त काम मी करून दाखवेल असे वाघमारे यांनी म्हण्टले आहे.शेषराव वाघमारे हे एम. एस. डब्लू पदवीधारक असून ते छोटेमोठे कामे करून आपला उदरनिर्वाह चालवितात. 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते.मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले वाघमारे दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडतात. ते दिव्यांगावर मात करून कोणावरही निर्भर न राहता जीवन जगत आहेत.
ते उंचीने कमी असल्याने त्यांना एका मोठया नामांकित सर्कसमध्ये काम करण्याची संधी आली. होती परंतु स्वाभिमानी वाघमारे यांनी सर्कसमध्ये काम न करता स्वतःच्या पायावर आज आपले नाव लौकिक केले आहे. अनेकांनी त्यांना मुंबई येथे जाऊन चित्रपटात काम करण्याचा हि सल्ला दिला. परंतु वाघमारे यांनी सामाजिक कार्याच्या पदवीचे शिक्षण घेत शिक्षणाला महत्व दिले.व त्यांनी अंगणवाडी प्रशिक्षण केंद्रात हि प्राचार्य म्हणून काम केले असून अंगणवाडीतील महिलांना प्रशिक्षणाचे धडे दिले आहेत.
अशा होतकरू, सर्वगुण संपन्न व्यक्तीने निवडणूक लढविण्याची ईच्छा व्यक्त केल्याने अनेकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर अनेकांनी त्यांच्या व्यंगत्वावर टिका केली. परंतु त्यांनी दिव्यांग अवस्थेत शिक्षण घेऊन आजच्या नवपिढीला व चांगल्या चांगल्या व्यक्तींनाही दाखवून दिले आहे की शिक्षणाचे हत्यार जवळ असले की एक सामान्य माणूस हि कांही करू शकतो. शेषराव वाघमारे यांची निवडणूक लढविण्याची ईच्छा आम्हाला बरेच कांही सांगून जात आहे… हे मात्र विशेष.