Tuesday, November 5, 2024
Homeमनोरंजन'रीलस्टार' चित्रपटात झळकणार प्रसाद ओक चित्रीकरणाचे पाहिले शेड्यूल नुकतेच पूर्ण…

‘रीलस्टार’ चित्रपटात झळकणार प्रसाद ओक चित्रीकरणाचे पाहिले शेड्यूल नुकतेच पूर्ण…

मुंबई – गणेश तळेकर

आजच्या स्मार्टफोनच्या जमान्यात रील्सना खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. छोट्या-मोठ्या रील्सच्या माध्यमातून कधी गंमतीशीर किस्से समोर येतात, तर कधी संवेदनशील मुद्द्याकडेही लक्ष वेधलं जातं. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने रील्सच्या माध्यमातून प्रत्येकातील रील स्टार जगसमोर येत आहे.

अशाच रील स्टार्सची कथा सांगणारा ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पाहिले शेड्यूल नुकतेच पूर्ण करण्यात आले. आता या चित्रपटात प्रसाद ओकची एन्ट्री झाल्याने ‘रीलस्टार’बाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तळागाळातील कलाकारांचा संघर्ष जगसमोर आणणाऱ्या ‘रीलस्टार’ची निर्मिती निर्माते जोस अब्राहम जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली करत आहेत. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या ‘अन्य’ या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस ‘रीलस्टार’चं दिग्दर्शन करीत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक मागील काही वर्षांपासून प्रकाशझोतात आहे. आपल्या अभिनयाचे वेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर करत तमाम मराठी-अमराठी रसिकांना मोहिनी घालणारा प्रसाद ‘रीलस्टार’मध्ये दिसणार असल्यानं या चित्रपटाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

प्रसाद एक उत्तम अभिनेता असून, सृजनशील दिग्दर्शकही आहे. त्यामुळे तो आपल्या वाट्याला आलेल्या कोणत्याही व्यक्तिरेखेला अगदी सहजपणे न्याय देण्यात यशस्वी होतो. ‘रीलस्टार’ या चित्रपटातही प्रेक्षकांना प्रसादच्या अभिनयाचे अनोखे रंग पाहायला मिळतील यात शंका नाही.

या चित्रपटातील प्रसादच्या व्यक्तिरेखेबाबत सध्या तरी कमालीची गुप्तता बाळगली जात असली तरी मिळालेल्या माहितीनुसार हे कॅरेक्टर ‘रीलस्टार’च्या कथानकात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. प्रसादसारख्या हरहुन्नरी अभिनेत्याची निवड करण्याबाबत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ म्हणाले की, ‘रीलस्टार’ हा चित्रपट समाजातील वास्तवदर्शी चित्र जगासमोर आणणारा आहे.

हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूला घडलेल्या बऱ्याच घटनांची आठवण होईलच, पण आसपासची कॅरेक्टर्सही पाहात असल्याचं जाणवेल. यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी आम्ही एका तगड्या अभिनेत्याच्या शोधात होतो. प्रसाद ओकच्या रूपात आमचा शोध संपला. त्याच्यासारखा मराठीतील आघाडीचा अभिनेता आमच्या टिममध्ये सहभागी होणं ही ‘रीलस्टार’ची जमेची बाजू असल्याचे सिम्मी म्हणाले.

‘रीलस्टार’ची पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. प्रसाद ओकसोबत या चित्रपटात भूषण मंजुळे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, राजेश मालवणकर, सरीता मंजुळे, महेंद्र पाटील, कल्पना राणे, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या खेरीज बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हसदे यांच्याही भूमिका आहेत. डिओपी शिनोब यांनी सिनेमॅटोग्राफीची बाजू सांभाळली आहे. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असून नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतसाज चढवला आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: