मूर्तिजापूर ते खेर्डा रस्त्याची गेल्या दोन, तीन वर्षांत अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गाने पायी चालणे कठीण झाले असून या मार्गावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. हा राज्यातील महत्वाचा स्टेट महामार्ग असल्याने या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहनाची वाहतूक असते. त्यामुळे अनेक अपघात या मार्गावर होतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या खड्यात पाणी साचले आहे. दुचाकी वाहनांना या रस्त्याने मोठी कसरत करावी लागत आहे. तर या मार्गावर नेहमीच विद्यार्थी व शेतकऱ्यांची वर्दळ असते. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या परंतु त्या तक्रारीकडे संबधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी निधी आणल्याचा गवगवा केला होता, मात्र एकवर्ष होऊन गेले तरी रस्त्याची अवस्था जैसे थे. या मार्गावर येणाऱ्या दहातोंडा, जामठी, हातगाव, उमरी, आरखेड, तुरखेड, मुरांबा, शिवण, बिडगाव या गावाच्या ठिकाणी रस्त्याची अवस्था फारच बिकट आहे. रस्त्याच्या मधात ठिकठिकाणी खड्डे पडले असून यातून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेक अपघात घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे. वाहने दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची आवश्यकता आहे. यावर्षी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. रस्त्यावर डांबरीकरण करण्याऐवजी केवळ खडी आणि माती टाकण्याचा प्रकार करण्यात आला. ही दुरुस्ती केवळ काही दिवसात निरुपयोगी ठरली. खडी बाहेर पडून खड्डे ‘जैसे थे’ अवस्थेत झाले आहेत.
या मार्गावरून चालणेही कठीण झाले आहे. हा मार्ग जीवघेणा बनला आहे. केवळ दिखाव्यासाठी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पावसाळ्यात या मार्गावर विद्यार्थी व शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.