Saturday, December 21, 2024
Homeराज्यमूळ शेत मालकाचे मोजणीस अतिक्रमणकर्त्याचा आक्षेप…गट दुरुस्तीचीही मागणी…भूमी अभिलेख कार्यालयात सुनावणी…

मूळ शेत मालकाचे मोजणीस अतिक्रमणकर्त्याचा आक्षेप…गट दुरुस्तीचीही मागणी…भूमी अभिलेख कार्यालयात सुनावणी…

तर दुसरीकडे अकृषिक आदेश व अतिक्रमणाची चौकशी पूर्ण…पण निकाल लांबणीवर…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील मौजे बळेगाव शेत शिवारातील गट क्र.३१४ ची मोजणी व हद्द कायम झाल्यानंतर मूळ शेतमालकाच्या या मोजणीस गट क्र. ३१२ व ३१३ ही शेतजमीन नियम डावलून अकृषिक करणाऱ्या व गट क्र.३१४ मध्ये अनधिकृत बांधकाम करणारानें आक्षेप घेतला असून तब्बल ३५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या गटनिर्धारणाची दुरुस्ती करण्याचीही मागणी केली आहे. या प्रकरणात उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने येत्या २५ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.

तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी आकोट यांचे कार्यालयात झालेल्या तक्रारीनुसार ह्या बेकायदेशीर अकृषिक आदेशाची व बांधकाम अतिक्रमणाची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. त्या चौकशीमध्ये सबळ पुराव्यांचे आधारे हे अकृषीक आदेश व बांधकाम अतिक्रमण या दोन्ही बाबींचा उलगडा झाला असून याबाबतीत निर्णयास मात्र विलंब लावण्यात येत आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, आकोट तालुक्यातील मौजे बळेगाव या शेतशिवारातील गट क्र.३१२ व ३१३ ही शेत जमीन नवीन कुमार गोकुळदास चांडक परिवाराने खरेदी केली. त्यानंतर सन २०१९-२० व २०२०-२१ मध्ये ही शेतजमीन तत्कालीन तहसीलदार यांनी नियम डावलून अकृषिक करवून दिली.

सोबतच आपले अधिकार कक्षेबाहेर जाऊन या ठिकाणी वाणिज्यिक व व्यावसायिक बांधकामास मंजुरात दिली. हे बांधकाम आपल्या शेतात झाल्याची बाब शेजारील जमीनधारक दिलीप गायकवाड यांचे निदर्शनास आली. त्यामुळे याची खातर जमा करणेकरिता त्यांनी दि.६.६.२०२३ रोजी आपल्या मालकीच्या गट क्र.३१४ ची मोजणी करविली. त्यावेळी चांडक परिवाराने त्यांचे जमिनीवर विटांचा कारखाना व गोडाऊन चे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले.

या मोजणीमुळे चांडक परिवाराने आपला गट क्र.३१३ सोडून गट क्र.३१४ मध्ये बांधकाम केल्याचे बिंग फुटले. परिणामी चांडक परिवार अडचणीत आला आहे. त्यामुळे काहीतरी कृल्प्ती लढवून या अडचणीतून सुटणेकरिता चांडक परिवाराने खटपट सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दिलीप गायकवाड यांचे या मोजणीवर आक्षेप दाखल केला आहे.

त्या आक्षेपा सोबतच या ठिकाणी पाडण्यात आलेले गट चुकीचे पद्धतीने पाडण्यात आल्याचा कांगावा करून त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयास गटनिर्मितीमध्ये दुरुस्ती करून देण्याची ही मागणी केली आहे.

ही मागणी करणेकरिता चांडक परिवाराने दिलीप गायकवाड यांचे गट क्र. ३१४ शी काहीही संबंध नसणारे जमीनधारक संजय रघुवंशी व हरिभाऊ पातुर्डे यांना आपले सोबत घेतले आहे. वास्तविक गायकवाड यांची मोजणी ही शासन निर्मित जंगल नकाशाचे आधारे करण्यात आली आहे.

या नकाशानुसार आकोट अकोला महामार्गालगत गायकवाड यांची गट क्र.३१४, त्यानंतर पश्चिमेकडे चांडक परिवाराची गट क्र.३१३ व ३१२ आणि त्यानंतर रघुवंशी यांची गट क्र. ३११ ही जमीन आहे. तर गायकवाड यांचे दक्षिणेस गट क्र.३१५ ही पातुर्डे यांची जमीन आहे. गायकवाड यांचे मोजणी मुळे रघुवंशी व पातुर्डे यांचे शेत जमिनीस कोणतीही बाधा पोचलेली नाही. तरीही या दोघांनी चांडक परिवारास सहकार्य करून गायकवाड यांचे मोजणीस आक्षेप घेतला आहे.

ह्या आक्षेपा सोबतच या लोकांनी येथील गटनिर्मितीवरही आक्षेप नोंदविला आहे. त्यांचे मते ही गट निर्मिती चुकीची आहे. गमतीशीर बाब म्हणजे या ठिकाणी गट निर्मिती १९८८ साली करण्यात आलेली आहे. त्याला आज रोजी तब्बल ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान या ठिकाणी अधिकृत जंगल नकाशाही तयार करण्यात आलेला आहे.

शासनाच्या विविध विभागात या नोंदी कायम करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसारच या जमिनीचे अनेक खरेदी व्यवहार झालेले आहेत. कहर म्हणजे हरिभाऊ पातुर्डे हे याच जंगल नकाशा नुसार शेत वाहिती करीत आहेत. संजय रघुवंशी यांनी गट क्र.३११ हे शेत दि. ३०.५.२०१५ रोजी खरेदी केलेले आहे. तेव्हापासून तेही याच गटनिर्मितीनुसार वाहिती करीत आहेत.

परंतु या दोघांनाही आजपर्यंत ह्या गटांबाबत आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही. त्यानंतर दि. २५.६.२०२० रोजी चांडक परिवाराने गट क्र. ३१२ व ३१३ ही जमीन खरेदी केली. विशेष म्हणजे त्यांनी दि.२.९.२०२० रोजी आपल्या जमिनीची मोजणी केलेली आहे. त्यावेळी त्यांनी दर्शविलेली वहिवाट व गट नकाशा यांचा मेळ बसला नसल्याचे आढळून आले.

ज्याची नोंद मो.र.क्र. १७७७/२०२० वर आजही आहे. त्यामुळे त्यांच्या गट क्र. ३१२ व ३१३ च्या हद्दी आतापर्यंत ही कायमच झालेल्या नाहीत. तरीही हरिभाऊ पातुर्डे संजय रघुवंशी आणि चांडक परिवार शांत बसले होते. परंतु गायकवाड यांनी मोजणी केल्याने चांडक परिवार अडकित्त्यात फसताच या लोकांना येथील गटनिर्मिती चुकीची असल्याचा एकदम साक्षात्कार झाला. आणि तिन्ही जमीन धारकांनी चवताळून तब्बल ३५ वर्षांपूर्वी कायम झालेल्या गट निर्मिती वर हल्ला चढविला. यावरून या लोकांच्या नियतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

अशा स्थितीत अर्जदारांचा अर्ज स्वीकारून भूमी अभिलेख आकोट कार्यालयाने याप्रकरणी चौकशी प्रारंभ केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यालयाने दि.२५ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. महत्त्वाचे म्हणजे भूमी अभिलेख विभागाने गायकवाड यांचे गट क्रमांक ३१४ ची मोजणी दि.६.६.२०२३ रोजी केलेली आहे. दि.११.८.२०२३ रोजी या शेताच्या हद्दी तंतोतंत जुळत असल्याने कायमही केलेल्या आहेत.

परंतु ज्या चांडक परिवाराच्या गट क्र. ३१२ व ३१३ या शेतांच्या हद्दी अद्यापही कायम झालेल्या नाहीत, त्यांची तक्रार ग्राह्य मानून भूमी अभिलेख विभागाने गायकवाड यांचे कायदेशीर मोजणीची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे चांडक परिवार व उपअधीक्षक भूमी अभिलेख आकोट यांचेतील “ये रिश्ता क्या कहलाता है?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी आकोट यांनी चांडक परिवाराच्या गट क्रमांक ३१२ व ३१३ या जमिनीच्या अकृषिक आदेशाची व बांधकामाची चौकशी पूर्ण केली आहे. भक्कम पुराव्यांच्या आधारे दोन्ही बाबी गैर कायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगररचना विभाग अकोला व संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी यांचे अहवालांनी हे गैरकायदेशीर चित्र अगदी उठावदार झाले आहे. परंतु गत पंधरा-वीस दिवसांपासून “आता देतो” “उद्या देतो” म्हणून निकालास विलंब होत आहे. त्यामुळे आता उपविभागीय अधिकारी आकोट व उप अधीक्षक भूमी अभिलेख आकोट हे काय निर्णय देतात त्याबाबत उत्सुकता ताणली जात आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: