नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप कुमार बनसोडे यांनी शिक्षण विभागाच्या सन २०२१ च्या अगोदरचे सर्व अभिलेखे/ संचिका चोरीला गेल्याची फिर्याद वजिराबाद पोलीस स्टेशन नांदेड येथे दि.१५-०९-२०२२ रोजी दिली होती.
ही तक्रार बनावट असल्याचे दिसल्यावर जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे फौजदारी याचिका दाखल केली.या वरून न्यायालयाने पोलीस निरीक्षक वजीराबाद नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड व पोलीस महासंचालक यांना नोटीस पाठवून केलेला तपास दाखल करण्याचे आदेश दिले.
दिलीपकुमार बनसोडे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) नांदेड यांनी शिक्षण विभागाच्या २०२१ अगोदरचे सर्व अभिलेखे, संचिका चोरीला गेल्याची फिर्याद दि.१५-०९-२०२२ रोजी वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये दिली होती या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षकांनी एफ. आय. आर दाखल केला. त्याचा नंबर ३३० असून दि१५-०९-२०२२ आहे.
चोरी न झालेल्या अभिलेखाची चोरी झालेली बनावट फिर्याद व या चोरीचा बनावट तपास असल्याचे या एफ.आय.आर वरून दिसून आल्यावर फिर्यादी तथा ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक नांदेड, पोलीस महासंचालक मुंबई, सीबीआय दिल्ली, शिक्षण आयुक्त पुणे, यांना सत्य चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. २०१२ नंतर शिक्षक भरतीवर शासनाने बंधन आणले होते.
तरी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात नियमबाह्य शिक्षक भरती करण्यात आली या भरतीस तत्कालीन शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांचा वचक नव्हता. नांदेड जिल्ह्यातही बरीच बोगस शिक्षक भरती करण्यात आली होती. त्यावेळेस त्या संस्थेची अद्यावत बिंदू नामावली नाही. विनाअनुदानित वरून अनुदानितवर बदल्या केल्या.
यापैकी काही जणांचे शालार्थ प्रणालीत नाव घेऊन वेतन सुरू झाले तर काही शिक्षकांचे वेतन सुरू करायचे राहिले होते. पण यांचे प्रस्तावाच्या संचिकाच शिक्षण विभागात उपलब्ध नव्हत्या. यावर उपाय म्हणून उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दिलीप कुमार बनसोडे यांनी दि.१५-०९-२०२२ ला वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये २०२१ अगोदरचे म्हणजेच जवळपास ६० ते ७० वर्षाचे संचिका, अभिलेखे सर्व चोरीला गेल्याची फिर्याद दिली.
या जवाबात त्यांनी दि. १६-०७-२०२२ व दि. १८-०७-२०२२ असे दोन दिवस चोरी झाल्याचे सांगितले व चोरी झाल्यावर तब्बल दोन महिन्यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून वजीराबाद पोलिसांनी कोणतीच चौकशी न करता कोणाचेही जवाब न घेता फाईल बंद केली. अशा बनावट चोरीच्या फिर्यादीच्या बनावट तपासणी ची मागणी कुलकर्णी यांनी करून ही काही चौकशी होत नाही.
म्हणून जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे फौजदारी याचिका दाखल केली. तिचा क्रमांक ४०१/२०२४ हा आहे. यावर फिर्यादीचे वकील अॅड व्हि.डी.पाटनूरकर यांनी या बनावट चोरीचा तपास योग्य झाला नसल्यामुळे शिक्षण विभाग बोगस शिक्षकांना मान्यता देत आहे.
याचा पुन्हा तपास होणे आवश्यक आहे .अशा युक्तीवाद केला. यावर न्यायमूर्ती मंगेश पाटील व शैलेश ब्रह्मे यांनी पोलीस निरीक्षक वजीराबाद नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड व पोलीस महासंचालक मुंबई यांना केलेला तपास दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच सीबीआयने पण पोलीस महासंचालक मुंबई पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांना सदरील प्रकरणी तपास करण्याचे आदेश दि.२३-०२-२०२४ रोजी एका पत्राद्वारे दिले आहेत.
या आदेशामुळे शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडून तपासासाठी बनसोडे उपशिक्षणाधिकारी नांदेड यांना पोलीस ताब्यात घेतील, अशी चर्चा शिक्षण विभागात होत आहे.