आकोट – संजय आठवले
फेसबुक द्वारे प्रेम जाळ्यात अडकलेल्या तीस वर्षीय पिडितेने आपल्यावर आकोट तालुक्यातील शहानुर पर्यटन स्थळी वनविभागाचे खोलीमध्ये बलात्कार करण्यात आल्याची तक्रार दिल्याने आरोपी अतुल अविनाश काळणे वय वर्षे २८ रा. रामदास पेठ अकोला याचे वर ग्रामीण पोलीस ठाणे आकोट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी द्वारे करण्यात आलेला अटकपूर्वक जामीन अर्ज आकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
या संदर्भात रामदास पेठ पोलीस ठाणे अकोला येथे तक्रार दाखल करण्यात आली कि, प्रकरणातील आरोपी अतुल अविनाश काळणे याची फिर्यादी महलेशी फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि त्यानंतर लग्न बंधनात बद्ध होण्याच्या आणा भाकाही झाल्यात. आरोपी पीडितेला वारंवार आपल्या प्रेमाचे प्रकटन करून तिच्याशी लग्न करणार असल्याची वारंवार ग्वाही देत होता.
ह्या अति प्रेमालापानी भारलेल्या पीडितेनेही आरोपीला बरेचदा आर्थिक मदतही केली. अशाप्रकारे दोघांमध्येही विश्वासाचे नाते दृढ झाल्यावर आरोपीने पिडितेला आकोट शहरा नजीकच्या शहानुर पर्यटन स्थळी आणले. त्या ठिकाणी वनविभागाद्वारे पर्यटकांकरिता बांधलेल्या एका खोलीमध्ये आरोपीने पीडीतेला नेले. त्या खोलीमध्ये आरोपी अतुलने दि. ८.१.२०२४ चे दुपारी एक वाजता चे सुमारास पीडीतेला आपल्या प्रेमाची साक्ष दिली आणि आपण लग्न करणार असल्याचा पुनरुच्चार केला.
त्यानंतर पिडितेची इच्छा नसताना आरोपीने तिच्याशी बळजोरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. आणि हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझी बदनामी करेल अशी धमकी ही दिली. त्या नंतर दि.३०.४.२०२४ रोजी आरोपीने पीडीतेला अकोला येथील एका हनुमान मंदिराजवळ दुपारी भेटीस बोलाविले आणि आपण दि.२.५.२०२४ रोजी लग्न करणार असल्याचे सांगितले. सोबतच लग्नाची साडी घेणे करिता तिला पाच हजार रुपये दिले.
ह्या प्रकारानंतर ठरल्यावेळी पीडितेने आरोपीला फोन केले. परंतु त्यांची उत्तरे मिळाली नाहीत. नंतर लगेच दि. ३.५.२०२४ रोजी आरोपी अतुलने पीडीतेला फोन करून सांगितले कि, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. या उत्तराने हादरलेल्या पिडितेला आपली फसवणूक व पिळवणूक झाल्याची खात्री पटली. त्यामुळे तिने झाल्या प्रकाराची रामदास पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
परंतु घटनास्थळ शहानुर हे आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत असल्याने हे प्रकरण आकोट ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यांनी भादवी कलम ३७६, ४१७, ५०६ अन्वये आरोपी अतुल अविनाश काळने वय वर्ष 2८ रा. रामदास पेठ अकोला याचेवर अपराध नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान आरोपी अतुल याने अटकपूर्व जामीन मिळणेकरिता आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांचे समक्ष याचीका दाखल केली.
या जामीन अर्जाला सरकारी वकील अजित देशमुख यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी आपल्या युक्तीवादातून घटनेची पार्श्वभूमी कथन केली. सोबतच त्यांनी न्यायालयास सांगितले कि, या प्रकरणात ज्या कारने आरोपीने पीडितेला शहानूर ता. आकोट येथे नेले होते, ती जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपीने पीडितेकडून घेतलेले रोख २५०००/- रू. व सोन्याचे मणी, मंगळसुत्र ९ ग्रॅम, अंगठी ४ ग्रॅम, कानातले ४ ग्रॅम, चेन १० ग्रॅम असे एकूण २७ ग्रॅम सोने यांची चौकशी करून ते हस्तगत करणे बाकी आहे. या आरोपीवर प्राप्त माहितीनुसार धनादेश अनादरणाची बरीच प्रकरणे अकोला न्यायालयात प्रलंबित आहेत. त्याबाबत माहिती, त्याच्या मोबाईल क्रमांकाची व इतर माहिती प्राप्त करून पुढील तपास करणे बाकी आहे.
आरोपीला जामीन दिल्यास तो फिर्यादीवर दबाव आणू शकतो. गुन्हयामध्ये इतर आरोपी आहे किंवा कसे याबाबत चौकशी करणे बाकी आहे. या आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तो तपास प्रक्रियेस सहकार्य करण्याची शाश्वती नाही. या गुन्हयाचा तपास पूर्ण झाला नसून अधिकचे साक्ष पुरावे गोळा करणे बाकी आहे. तो इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. तसेच तो पुरावेही नष्ट करण्याची शक्यता आहे. याकरिता आरोपीची कस्टडी घेवून तपास करणे आवश्यक आहे.
यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी पुढील तपास आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण सोनोने हे करीत आहेत.