Monday, December 23, 2024
HomeUncategorizedबिलोली तालुक्यात वाळूमाफियांचा उच्छाद; महसूल व पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका - साखर...

बिलोली तालुक्यात वाळूमाफियांचा उच्छाद; महसूल व पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका – साखर झोपेत ट्रक्टर व गाडीच्या आवाजाने होतोय नागरिकांना त्रास…

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली तालुक्यात महसुल व पोलीस प्रशासनाच्या अधिपत्याखाली वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून चोरीने रात्रभर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या आवाजामुळे नागरिकांना ऐन साखर झोपेत त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाच्या गौनखनिजची लूट शासनाच्या अधिकाऱ्यांच्याच अप्रत्यक्ष सहकार्याने होत असल्याने कुपंनच शेत खात आहे असेच म्हणावे लागेल नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुका गौनखनिजचा खजाना म्हणून ओळखला जातो.येथील मांजरा नदीच्या वाळूला अंतरराज्यात सोन्याचा भाव असल्यामुळे वाळूला जास्त मागणी आहे.त्यामुळे जिल्ह्यात शासनाला गौनखनिजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.

महसूल व पोलीस अधिकाऱ्यांसाठी हा तालुका सोने की चिडीया आहे.शासकीय टेंडर असो अथवा नसो मांजरा नदी पात्रातून सातत्याने वाळूची चोरीने विकण्याचा गोरखधंदा जोमात चालू आहे.सध्या बिलोलीचे महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाळूमाफियांनी रात्रीच्यावेळी उच्छाद मांडला असून रात्रभर ट्रक्टरने चोरीची वाळू वाहतूक होत आहे.

त्यामुळे नागरीक साखर झोपेत असतांना या ट्रॅक्टरच्या आवाजाचा नाहक त्रास ग्रामस्थांना व नागरिकांना होत आहे.तालुक्यातील येसगी, हूनगुंदा,माचनूर,नागणी गंजगाव या सर्वच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असुन चक्क 20 ते 30 ट्रॅक्टर 10 व 12 टायरी हायवाने वाळूची वाहतूक केली जात आहे.

बिलोली व कुंडलवाडी पोलिसांची नाईट पेट्रोलिंग तर केवळ वाळू माफियांचा संरक्षणासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तर येथील महसुलचे अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे.

या दोन्ही विभागाच्या गलथान कारभारामुळे वाळूमाफिया चक्क पहाटे ६ वाजेपर्यंत वाळूची चोरटी वाहतूक करत ट्रक्टर सुसाट वेगाने चालवली जात असल्यामुळे पहाटे जॉगिंगसाठी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत ठेऊन फिरावं लागत आहे.

महसूल व पोलीस विभागाच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे वाळमाफियांचे मुजोरी वाढली आहे.जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन चोरट्या वाळूमुळे शासनाचा लाखोचा बुडणारा महसूल वाचावावा व संबंधित महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: