अकोला – संतोषकुमार गवई
अकोला जिल्ह्यात मंजूर नियतव्ययानुसार विविध विकासकामांना 30 जूनपूर्वी चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक नियोजनभवनात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गतवर्षी वार्षिक योजनेद्वारे विविध विकासकामांना चालना देण्यात आली. ती तत्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत. विविध विभागांनी प्रत्येक कामांच्या सद्य:स्थितीसह अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा. ज्या कामांच्या मान्यता, निविदा आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण नसतील, त्या पुढील दोन आठवड्यात पूर्ण करून घ्याव्यात. यावेळी जिल्हाधिकारी गतवर्षीच्या नियोजनानुसार खर्चाचा आढावा घेतला.
पुढील वर्षात करावयाच्या कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. विविध क्षेत्रांतील कामांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार कामांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. विविध विभागप्रमुख उपस्थित होते.