Sunday, November 17, 2024
Homeराज्यपत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा खामगावात निषेध...आरोपींवर कठोर कारवाई करा - पत्रकारांची...

पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा खामगावात निषेध…आरोपींवर कठोर कारवाई करा – पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

खामगाव – हेमंत जाधव

पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा खामगावात पत्रकार बांधवांकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आज दि.12 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनामध्ये नमुद आहे की, पुरोगामी संघटनांतर्फे पुणे येथे 9 फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो कार्यक्रमात व्याख्याता म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवूण दगडफेक केली तसेच शाईफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या.

यात गाडीतील काही जण जखमी सुध्दा झाले असून हल्ल्यामध्ये निखिल वागळे हे सुदैवाने बचावले आहेत. वागळे यांच्यावर झालेला हा सातवा हल्ला आहे. यापुर्वी सुध्दा त्यांच्यावर जिवघेणे हल्ले झाले आहेत. पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो. तसेच संबंधित हल्लेखोरांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाव्दारे करीत आहोत.

आपल मत मांडण्याचा प्रत्येक भारतीयाला संविधानाने अधिकार दिला आहे. मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना जर आपले मत मांडण्यापासून रोखण्यासाठी जिवघेणे हल्ले होत असतील तर देशात लोकशाही जिवंत आहे का हा संशोधनाचा विषय आहे. निर्भिडपणे सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करून पत्रकारांचा आवाज दाबता येत नाही.

पत्रकारांची लेखणी अधिक बाणेदारपणे अन्यायाविरुद्ध आणि झुंडशाहीविरुद्ध आवाज उठवित आली आहे व यापुढे सुध्दा राहणार असल्याचे निवेदनामध्ये नमुद केले आहे. यावेळी नायब तहसीलदार पाटील यांनी निवेदन स्विकारले. निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, जगदीशसेठ अग्रवाल, मो.फारूख, अनिल खोडके, अशोक जसवाणी,

शरद देशमुख, योगेश हजारे, किरण मोरे, नाना हिवराळे, मोहन हिवाळे, मनोज नगरनाईक, राहुल खंडारे, अनुप गवळी, आनंद गायगोळ, मुबारक खान, हेमंत जाधव, सुधिर टिकार, किशोर होगे, चंद्रकांत मुंडीवाले, महेश देशमुख, गणेश पानझाडे, विनोद भोकरे, महेंद्र बनसोड, सचिन बहुरूपी, सिध्दांत उंबरकार, संतोष करे, सुमित पवार यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: