Thursday, July 18, 2024
spot_img
Homeराजकीयराजकीय आंकाक्षेपोटी वास्तवतेला नाकारून पुन्हा जाती बळकट करण्याचे कृत्य जर आपल्या हातून...

राजकीय आंकाक्षेपोटी वास्तवतेला नाकारून पुन्हा जाती बळकट करण्याचे कृत्य जर आपल्या हातून घडत असेल तर…

आंबेडकरी विचारधारा ही आयुष्याला दिशा देणारी मार्गदर्शकतत्वे आहेत,

ज्यांना या मार्गावर चालता येत नाही किंवा चालायचे नाही त्यांनी तर मुळीच आंबेडकरवाद शिकवू नये, त्यांना तो नैतीक अधिकारही नाही… विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे देव व मंदीरपुजा नाकारून हिंदु धर्मालाच आव्हान दिले होते, परंतू आजच्या परिस्थितीत राजकारणाच्या नावाखाली राजकिय स्टंटबाजी करत मंदीरात जाऊन तथा पुजा करून हिंदु धर्माची मनधरणी करून चक्क विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेलाच नाकारून बाबासाहेबांनाच आव्हान देत आहोत की काय ?

असा प्रश्‍न निर्माण होत आहे, उलट हिंदु धर्मातील धर्मवाद्यांना चालीरिती,रूढी परंपरा नाकारायला लावून बुध्द व बाबासाहेबांचा मानवतावाद स्विकारायला भाग पाडून जातीव्यवस्था संपुष्टात आणण्यासाठीच प्रयत्न व्हायला हवे आहे,परंतु राजकीय आकांक्षेपोटी तथा मतांच्या हव्यासापोटी पुन्हा देवपुजा किंवा मंदीरगमन करणे हे कितपत योग्य आहे ?

हा विचार ज्याचा त्याचा त्यांनी करायला हवा, आंबेडकरी चळवळीत काम करणा-या कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी राजकीय आंकाक्षेपोटी मंदीर प्रवेश किंवा देव आरती केली की, पार त्यांच्यावर टिकेची झोड उठवायची,तो नेता किती चुकीचे करतोय हे दाखवून द्यायचे आणि आपल्या आवडत्या नेत्यांनी केलं की,ते योग्यच केलं असं ठासून सांगायचं, भाई लोग यह कैसा न्याय है ?

और ऐसा कैसा चलेगा ? इतर धर्माचा आदर केला पाहीजे हे खरं आहे, पण म्हणुन काय बाबासाहेबांच्या विचारधारेलाच हरताळ फासायचे का ? हा महत्वाचा प्रश्न आहे, यातून मला एवढेच सांगायचे आहे की, आपल्या आवडत्या नेत्यांनी चुकीचे जरी केले तरी माना डोलावत ते बरोबरच आहे, असे म्हणणा-यां बांधवांनो मग त्याचवेळी हेही लक्षात असू द्या, इतर नेत्यांनी केलं तेही बरोबरच असेल असं म्हणण्याची नैतीकता तरी आपल्या विचारांत असू द्या.

परंतु हेही तितकेच सत्य आहे की, राजकीय आंकाक्षेपोटी वास्तवतेला नाकारून पुन्हा जाती बळकट करण्याचे कृत्य जर आपल्या हातून घडत असेल तर ते अयोग्यच आहे हे मात्र मी ठणकाऊनच सांगेल, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला अर्थात बावीस प्रतिज्ञा नाकारून राजकारण सुरू असेल तर ते अयोग्यच आहे, भलेही राजकारणात यश नाही मिळाले तरी चालेल परंतु धर्मपरिवर्तनांची नांदी पुकारूनच जाती नष्ट करण्याचा मोठा लढा उभा राहू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे,

आंबेडकरवादी म्हणवून घेणारांचे धर्मवादी विचार नष्ट होऊन मंदीराकडची पाऊलं शिक्षण मंदीर अर्थात वाचनालयाकडे वळत नाहीत तोपर्यंत आंबेडकरी समुहाच्या व्यवस्थेत कुठलाच सामाजिक व राजकीय बदल होऊ शकत नाही हेही त्रिवार सत्य आहे असे मला वाटते, म्हणुन इतरांकडे बोट दाखवून दोष देऊन इतरांना दोषी ठरविण्यापेक्षा नेमकी आपलीही कृती काय आहे हे बघून योग्य दिशेनं वाटचाल केली तर ते जास्त आंबेडकरी समाजव्यवस्थेच्या भल्याचं असेल असं मला वाटतं,

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी मांडलेल्या विचारधारेवर कुणाचीही मक्तेदारी नाही,त्यामुळे याने काही बोलू नये,त्याने काही बोलू नये किंवा लिहू नये असे म्हणण्याचा कुणी केविलवाणा प्रयत्न करू नये,तथागत बुध्द व बाबासाहेब हे विश्वव्यापी मानव कल्याणाचे भान असलेले महामानव होते व त्यांचे विचार आजही मानव कल्याणाचे भान असणारेच विचार आहेत,त्यामुळे मी म्हणजेच लायक व इतर म्हणजे नालायक असा विचार करण्याचा मुर्खपणा कुणीच समाजबांधवांनी किंवा कार्यकर्त्यांनी करू नये या मताचा मी आहे, प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा संविधानिक अधिकार आहे,

झुंडशाहीच्या बळावर लोकशाहीवर दबाव आणणे हे संयुक्तीक होणार नाही, अर्वाच्च्य भाषेत बोलणे इथल्या भारतीय नागरिकाला शिकवावे लागत नाही,परंतु जो तो आपले नितीमुल्य जपण्याचा प्रयत्न करत असतो,याचा अर्थ तो दहशत निर्माण करणा-यांच्या दबावाला बळी पडतो किंवा घाबरतो असे नाही तर त्याला असे असभ्य पणाचे बोलणे,वागणे किंवा खोटेच पण रेटून नेणे सुध्दा आवडत नाही म्हणून कदाचित तो आपल्याला उलट काही बोलत नसेल,

परंतू आपल्या चुकीच्या कृत्याने स्वत:चे व समाजाचे किती नुकसान करून घेतो याची कल्पना भान हरवलेल्या व्यक्तींना किंवा समुहांना कदाचित नसावी, म्हणुन ते तसे करत असतील,प्रत्येक व्यक्तीची बुध्दी व दृष्टी आपापल्या लायकीप्रमाणे विकसित झालेली असते आणि आपण त्यालाच परिपुर्ण समजून मीच सत्य किंवा आमचेच सत्य असे समजून कृत्य करीत असतो,परंतू हे जरी सत्य असले तरी आम्हाला व देशाला स्वत:च्या स्मित विकसित झालेल्या बुध्दीची किंवा दृष्टीची आवश्यकता नसून विशाल व प्रचंड ताकदीच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर विद्वत्तेला काबीज करणा-या महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बुध्दीची व दृष्टीची आवशकता आहे,

म्हणून येणा-या काळात स्वनिर्मित करण्यापेक्षा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संस्थांची व संस्थेच्या घटनांची अर्थात संविधानांचीच अमलबजावणी करणे देशहिताचे ठरेल,याची मलातरी पुर्ण खात्री आहे,परंतू कुठल्याही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी समाजबांधवाला काहीच समजत नाही,तो बेअक्कल आहे असे समजून मी जे करतो तेच खरं माना असा अट्टहास करू नये, जी काही कृती करायची आहे ती कारणमिमांसा होऊन समाजबांधवांसमोर येऊन समाजबांधवांना विश्वासात घेऊन व्हायला हवी, समाजबांधवांनीही सोकावलेल्या काळाचा अचूक वेध घेऊन आता सजग व्हायलाच हवं, अन्यथा काळ आपल्यावर ओझे बनून आपल्यालाही व येणा-या पिढीलाही सतावत राहील, नव्हे गुलाम बनुनच जगावे लागेल..

विकास साळवे,पुणे पत्रकार,
+919822559924..✍

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: