Politics : शिंदे फडणवीस सरकार राज्यात गेल्या 16 महिन्यापासून स्थापन झाले, सोबतीला राष्ट्रवादी पक्ष फोडून अजीतदादालाही कामाला लावले. या दीड वर्षात शिंदे गटातील काही आमदारांना रोज रात्री मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली मात्र सकाळी झाली की जैसे थे. काहींनी तर दादा मुख्यमंत्री बनले पाहिजे यासाठी देवाच्या आराधनाही सुरु केल्यात. आता पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून फडणवीस शिंदे-अजित पवार गटातील आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्याच काहीच घेणदेन नाही ते म्हणजे रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही एका मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे या विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला गच्छंती हे पाहावं लागणार आहे.
राज्यातील विधानसभेचा कार्यभार पुढील वर्षात संपणार आहे. मात्र तिन्ही पक्षातील लोकांची मंत्रीपदाची ओढ कमी होतांना दिसत नाही. 6 महिन्याकरिता का होईना मंत्रिपद भोगून घ्यावे पुढे काय होईल सांगता येत नाही. आता माहिती येत आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील काही नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. म्हणजे दुसर्या पक्षातून येणाऱ्या आमदारांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळणार आणि भाजपाचे आमदार गेले वाऱ्यावर. खरतर भाजपच्या आमदारावर तेव्हाच आभाळ कोसळलं होत, जेव्हा अजित पवारांचा गट सरकारमध्ये सामील झाला. पाहुणे तुपाशी घरचे उपाशी अशी खदखद भाजपच्या आमदारांमध्ये होत आहे. पण उघडपणे बोलू शकत नाही.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हा विस्तार काही ना काही कारणाने पुढे जात गेला. विस्तार होणार एवढीच माहिती मीडियाला वारंवार दिली गेली. पण कधी होणार हे सांगितलं नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छूक चांगलेच अस्वस्थ झाले होते. मात्र, एक दिवस अचानक मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण त्यात शिंदे गट किंवा भाजपचे इच्छूक आमदार नव्हते. तर थेट अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी झाला. अजितदादा यांचा गट भाजप सरकारला येऊन मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराला का विलंब होत होता याचं उत्तरही मिळालं होतं. आताही मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. केवळ विस्तार होणार एवढंच सांगितलं जातं.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आता तिसऱ्या मंत्रिमंडळ काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
राज्यात मोठा धमाका होणार आहे असे राज्याच्या टीव्ही मिडीयावर दररोज दावे केले जातात. त्यामुळे जनतेचा सुद्धा काही मिडियावरून विस्वास उडला आहे. आता शंभूराज देसाई यांनी दावा केला की, शरद पवार गटातील मोठा नेता महायुतीत येणार आहे. मात्र हे कितीपत खरे आहे हे सांगता येत नाही.