Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यजनतेने घाबरून जाऊ नये, नागपूर जिल्हयात मुबलक पेट्रोल व गॅस साठा :...

जनतेने घाबरून जाऊ नये, नागपूर जिल्हयात मुबलक पेट्रोल व गॅस साठा : जिल्हाधिकारी…

गरज पडल्यास पंप व पुरवठाधारकांनाही पोलीस संरक्षण

राजू कापसे

दि.२ नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डीझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे.याशिवाय पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात कालपासून ट्रक चालकांनी काही ठिकाणी रस्तारोको आंदोलन केल्यामुळे इंधन टंचाईची अफवा पसरली आहे. शहरात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल व गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींची सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पेट्रोल डिझल व गॅस डिलर असोशिएशनने नमूद केले की, सदर संपाला आमचा पाठिंबा नाही. स्वतःच्या टँकरने पुरवठा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी पोलीस संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीमधूनच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी चर्चा करून टँकर धारकांना पोलीस संरक्षणाची हमी दिली. याशिवाय नागपूर पोलीस आयुक्तांशी देखील त्यांनी परिस्थितीबाबत चर्चा केली.

माध्यमांसाठी त्यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये जिल्ह्यात कुठेही पेट्रोल डिझेल व गॅसची टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. मुबलक साठा सर्वत्र उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत गोंधळून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक असेल, गरज नसेल तर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
ज्या ठिकाणी अतिरिक्त मागणीमुळे पेट्रोल संपले असेल त्या ठिकाणचा पेट्रोल पुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येईल.

तसेच आवश्यकता नसेल तर गॅस सिलेंडरचे देखील बुकिंग करू नये, असेही त्यांनी आवाहन केले आहे. गॅसचा साठा मुबलक उपलब्ध आहे. यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणाऱ्या ट्रक ,टेम्पोला तसेच रुग्णवाहिकांना अडथळा होणार नाही. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: