अकोला – संतोषकुमार गवई
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता ” खरीपपूर्व कृषी मेळावा” आयोजित केला आहे. कृषी महाविद्यालय, अकोलाच्या स्व. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित या मेळाव्यामध्ये येत्या खरीप हंगामातील संभाव्य पाऊसमान, विविध पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, मृदा व जलसंधारण व्यवस्थापन, एकीकृत कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित यंत्र व अवजारे इत्यादी बाबत शेतकरी बंधूंना विविध विषय तज्ञांमार्फत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांचे शेतीविषयक प्रश्नांचे शंका समाधान देखील विद्यापीठाचे शास्त्रज्ञ करणार आहेत.
या मेळाव्याचे निमित्ताने विद्यापीठ निर्मित व उपलब्ध बी- बियाणे, जैविक खते, विद्यापीठ प्रकाशने इत्यादी कृषी निविष्ठा शेतकरी बांधवांकरिता विक्रीसाठी उपलब्ध राहतील. सदर मेळाव्यासाठी शेतकरी बांधवांची नोंदणी दिनांक 21 मे 2024 रोजी सकाळी 09 ते 10 या वेळात कृषी महाविद्यालय अकोला येथे करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले आहे.