Monday, December 23, 2024
Homeराज्यवेगवेगळ्या वन गुन्ह्यात फरार आरोपीसह एकास अटक, आलेगाव वनपरिक्षेत्रातील घटना...

वेगवेगळ्या वन गुन्ह्यात फरार आरोपीसह एकास अटक, आलेगाव वनपरिक्षेत्रातील घटना…

पातूर – निशांत गवई

आलेगाव वन परिक्षेत्रांतर्गत वेगवेगळ्या वन गुन्ह्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 21) जूनला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आलेगाव वनपरिक्षेत्रातील शेकापूर नियतक्षेत्रातून सागवान झाडाची तोड करून नग घेऊन मोटरसायकलवर जाताना आरोपी आकाश रणमळे व ओंकार लहामगे हे वनकर्मचारी यांच्या अंगावर मोटर सायकल घालून फरार होण्यात यशस्वी झाले होते. फरार होताना आरोपीकडून आलेगाव कार्ला रोडवर 7 हजार 502 रुपये किंमतीचा सागवान माल जमा करण्यात आला होता.

आरोपींवर वन गुन्हा नोंदविण्यात आला होता. यापैकी फरार आरोपी आकाश रणमळे यास पाळत ठेवून वनकर्मचा-यांनी ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी आकाश रणमळे हा नियमित वनक्षेत्रात जाऊन तसेच खासगी शेतातील सागवान झाडे तोडत असल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान आढळून आले. आरोपीकडून वन गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल सीडी 100 एसएस विना नंबर प्लेटची जप्त करण्यात आली.

वृक्षतोड करताना एकास अटक

दरम्यान 26 जूनच्या सकाळी दुस-या प्रकरणात शेकापूर नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 59 मध्ये गस्त करीत असताना अज्ञात इसम झाडे तोडत असल्याचा आवाज ऐकून वनरक्षक आदित्य देशमुख व प्रदीप राठोडसह कर्मचा-यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी दोन आरोपी कु-हाड घेऊन पळून जाताना दिसले. यापैकी एका आरोपीला वनकर्मचा-यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. घटनास्थळी आरोपीकडून साग वृक्षाचे दोन नग किंमत 7 हजार 198 रुपये जप्त करण्यात आले.

आरोपी प्रभाकर मांगाडे यास ताब्यात घेण्यात आले. दुसरा आरोपी संजय रनमळे फरार होण्यात यशस्वी झाला. दोन्ही आरोपींना 27 जूनला पातूर न्यायालयालयात वन कोठडीसाठी हजर करण्यात आले. सदर कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आदित्य देशमुख व प्रदीप राठोड यांनी केली. दोन्ही वन गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांनी दिली. दोन्ही प्रकरणी वनपाल संदीप ढेंगे पुढील तपास करीत आहेत.

वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पातूर तालुका हा वनसंपदेने समृद्ध असा परिसर आहे. मात्र याठिकाणी वृक्षतोडीच्या घटना वारंवार कानावर येतात. त्यावर थातूर-मातूर कारवाई केली जाते. दोन चार महिन्यात एखाद दुसरा आरोपी पकडण्यात येतो तर इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी अॅक्शन प्लॅनची गरज असून त्यादृष्टीने वनाधिकारी व कर्मचा-यांनी पाऊले उचलण्याची गरज निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: