जि. प. केंद्रीय उच्च प्राथ. शाळा क्र १ सेमी इंग्लिश येथे आयोजन…
भंडारा – सुरेश शेंडे
शैक्षणिक नविन सत्राचा ०१ जुलैला शुभारंभ झाला. नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व शालेय पाठ्यपुस्तके देऊन त्यांचे स्वागत जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथ. शाळा क्र. १ गणेश वार्ड साकोली येथे सोमवारी ०१ जुलैला करण्यात आले. याप्रसंगी स्वागतार्थ कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातील सर्वात जूनी सन १८६० पूर्वी स्थापित जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. १ गणेश वार्ड या शाळेत शालेय नविन सत्रामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, उपाध्यक्ष रिना चचाने, सदस्य हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, अरविंद राऊत, मोनित टेंभूरकर, आदित्य जांभूळकर, रवि वलथरे, जयपाल सयाम हे हजर होते.
स्वागत कार्यक्रमात राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्य गीत, प्रतिज्ञा, सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे, परीपाठ व इंग्रजीतून ७ वी च्या मुलींनी संभाषण कौशल्य सादर केले. येथे नविन शिक्षिका चित्रलेखा इंगळे यांचे सर्व शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी “जबाबदार पालकांचे लक्षण. मुलांचे उत्तम शिक्षण, चल चल शाळेला जाऊया तारा..
नको राहू तू घरच्या घरा” असे संदेश फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातील लाखांदूर रोड – साकोली न्यायालय – गोवर्धन चौक ते गणेश मंदिर चौक प्रभातफेरी काढून मुलांनी शाळेत चला यावर जनजागृती केली. यावेळी शिक्षकवृंद एम. व्ही. बोकडे, चेतन बोरकर, टी.आय. पटले, बलविर राऊत, चित्रलेखा इंगळे हजर होते. संचालन शिक्षिका शालिनी राऊत यांनी केले. स्वागत कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता पालक भगिणी आणि गणेश वार्डातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.