आदर्श गांव निर्मितीसाठी पुरस्कारप्राप्त शेतकरी इतरांना मार्गदर्शक ठरावेत : कुलगुरू डॉ. शरद गडाख…
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात “कृषि दिन”उत्साहात साजरा…
अकोला – संतोषकुमार गवई
महाराष्ट्र राज्याचा विचार करता कृषिविषयक शिक्षण,संशोधन व विस्तार कार्य या तीनही बाजूवर अकोला कृषी विद्यापीठाचे कार्य निश्चितच अभिनंदनीय व प्रशंसनीय असल्याचे गौरवास्पद प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी केले. हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित “कृषी दिन” कार्यक्रमाचे प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.
महाबीज चा प्रतिनिधी म्हणून या विद्यापीठाचे कार्य जवळून बघण्याची संधी प्राप्त झाली आणि विविध समस्यांचे संकट असताना सुद्धा विद्यापीठातील प्रत्येक घटकाने आपले कार्य सचोटीने पार पाडत या विद्यापीठाला एक लौकिक प्राप्त करून दिला याची जाणीव असल्याचे सांगतानाच विद्यापीठ निर्मित पिकवाण, आधुनिक शेती तंत्रज्ञानासह यंत्रे व अवजारांचा प्रभावी वापर करीत फायद्याची शाश्वतं शेती करणारे आपण सर्वं पुरस्कारार्थी शेतकरी बंधू – भगिनी या विद्यापीठाचे पाईक होत आपल्या गावकऱ्यांसाठी शाश्वतं शेतीचे मार्गदर्शक व्हावे असा आशावाद देखील सचिन कलंत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केला.
तर फायदेशीर शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अवलोकन करीत त्या प्रत्यक्ष आंमलात आणणेसाठी शेतकरी बांधवांनी विद्यापीठाला भेट देण्याचे आवाहन करतांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विभागनिहाय आपल्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठांमध्ये नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत आदर्श गांव निर्मितीसाठी विद्यापीठाचे प्रयत्न आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात अधोरेखित केले व “जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जण” या उक्ती प्रमाणे आपण केलेले प्रयोग, आपले अनुभव इतरांना अवगत करत शाश्वत ग्रामविकासात आपले योगदान दयावे असा आशावाद देखील व्यक्त केला. या विद्यापीठाने कालसुसंगत संशोधना सह कृषी शिक्षणाचे माध्यमातून हजारो युवकांना कृतीयुक्त शिक्षित केले असल्याचे समाधान व्यक्त करत डॉ गडाख यांनी विदर्भ प्रदेश सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी कृषी विद्यापीठाची कटिबद्धता व्यक्त केली व कुठल्याही शाखेतील पदवीका अथवा पदवीधरांना शेती क्षेत्रामध्ये रोजगार तथा स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रचंड वाव असून यासंबंधी विद्यापीठांमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचे देखील सांगितले.
विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित या अतिशय महत्त्वाकांक्षी “कृषी दिन” कार्यक्रमाचे प्रसंगी महाराष्ट्र शासनाद्वारे सन 2022 या वर्षात पुरस्कृत केलेले कृषिभूषण पुरस्कार , उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार , डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त विदर्भातील एकूण 22 शेतकरी बंधू-भगिनींना आज सन्मानित करण्यात आले.
कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विठ्ठल सरप पाटील, श्रीमती हेमलता अंधारे यांचेसह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, कुलसचिव सुधीर राठोड आदींची विचारपीठावर उपस्थिती होती. कृषी महाविद्यालय अकोलाच्या के आर ठाकरे सभागृहात संपन्न झालेल्या मुख्य सोहळ्याचे प्रसंगी विद्यापीठातील विदर्भातील 11 ही जिल्ह्यामधून शेतकरी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला कृषी दिनाचे आयोजना संदर्भात संचालक विस्तार शिक्षण डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी आपले प्रास्ताविकात सविस्तर निवेदन केले. याप्रसंगी सन 2022 या वर्षात वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप उर्फ रामदास नारायण फुके (मु. चांभई. ता. मंगरुळपीर. जि. वाशिम), प्रकाश गोपीचंद मस्के ( मु.डवा. पो.धारगाव. ता. जि. भंडारा), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्रीमती ममता प्रमोद ठाकूर ( मु. पो. कारला. ता. चांदुर रेल्वे. जि. अमरावती), श्रीमती विमलादेवी वाघोजी गेडाम (मु.पो.राजुरा. ता. राजोरा. जि.चंद्रपूर), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कारप्राप्त भागवत श्रीराम ढोबळे (मु. बाभुळगाव. पो. पार्डी आसरा. ता. जि. वाशीम),
वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीणदास रामदास बेलखेडे(मु. वाघोली पो.काटपुर. ता. मोर्शी जि. अमरावती), सुनील मोतीराम चरपे ( मु. पो. मेंढला. ता. नरखेड जि. नागपूर), युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर शेषराव ढोरे (मु. महागाव. पो. दगडपारवा ता.बार्शीटाकळी जि. अकोला), अभय वसंता भुते (मु. जेवनाळा, पो. गुरढा.ता.लाखनी जि. भंडारा), उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी शशी भूषण भाऊराव उमेकर (मु. पो. टेंभुर्खेडा. ता.वरुड. जि. अमरावती), रतनलाल दादाजी बोरकर (मु. सुलतानपूर. ता. हिंगणघाट. जि. वर्धा),
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी युवराज पुंडलिकराव आव्हाळे (मु. जांब. ता. मंगरूळपीर. जि.वाशिम), राजेश विठ्ठल चोपडे (मु. माटोडा. ता.मूर्तिजापुर. जि.अकोला), विठ्ठल मारुती मालेकर (मु. पो. दहेगाव. ता. वणी. जि. यवतमाळ), आनंद गजाननराव बारबुद्धे (मोर्शी. ता.मोर्शी. जी अमरावती), देविदास एकनाथ जाधव (मु.भुसर. ता.मोताळा. जि.बुलढाणा), विठ्ठल दादोजी पटले (मु. सोनेगाव. ता. तिरोडा जि.गोंदिया), चंद्रभान श्रीराम सावरकर (मु.पो.भुगाव.ता. कामठी.जि. नागपूर), रविंद्र वसंतराव वैद्य (मु.पो.नंदुरी. ता. समुद्रपूर. जि.वर्धा),
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) श्रीमती शांता गंगाराम धांडे (मु.पो.मडकी. ता. चिखलदरा जि.अमरावती), देवराव कोंडूजी शेडमाके (मु.डोंगरगाव. ता. गोंड पिंपरी जि. चंद्रपूर) यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे यांनी व आभार प्रदर्शन विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. प्रकाश घाटोळ यांनी केले. कृषी दिन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे मार्गदर्शनात विस्तार शिक्षण संचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.