गडचिरोली – मिलिंद खोंड
छत्तीसगड सीमेवरील गोडलवाही पोलीस स्टेशन पासून १० किमी अंतरावर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार गडचिरोली पोलीस दलाकडून तातडीनेशोधमोहीम राबवली या दरम्यान माओवाद्यांनी अभियान पथकावर अंदाधुंद गोळीबार केला असता पोलीस दलाने प्रत्युत्तर देत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले.
ही चकमक जवळपास एक तास सुरू होती. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता एक एके ४७ आणि एक एस एल आर रायफल सह दोन पुरुष माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.
मृतक नक्षली वट्टी हा २०१९ मधील जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. ज्यात गडचिरोली पोलिसांचे १५ जवान शहीद झाले होते. पुढील ऑपरेशन आणि परिसराचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह गडचिरोली येथे आणले असुन दुसऱ्या मृतकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.