लोकसभा निवडणुकीत मोदी व भाजपाचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती आता परिवर्तन रोखू शकत नाही.
अमरावती – भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे तो केवळ हवा निर्माण करण्यासाठी असून भाजपाचा दारुण पराभव होणार यात तिळमात्र शंका नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही त्याची जाणीव आहे.
अमरावती लोकसभा मतदारंसघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच ‘मोदींची हवा नाही, हवेत उडू नका’ हे सांगून वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब करत भाजपच्या फुग्यातील हवा काढली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपाच्या उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या प्रचार सभेतच मोदींची हवा नसल्याचे स्पष्ट केले. २०१९ साली मोदींची हवा असतानाही अमरावतीतून अपक्ष म्हणून निवडून आले, मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका असेच बजावले आहे.
नवनीत राणा यांना वस्तुस्थिती समजलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र हे समजलेले नाही, ते अजूनही हवेतच आहेत. मोदींचे नाणेच खणखणीत आहे, यावर या दोन नेत्यांचा अद्याप विश्वास आहे. २००४ साली सुद्धा ‘इंडिया शायनिंग’ आणि ‘फिलगुड’च्या हवेत असलेल्या व अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींच्या सत्तेला सोनियाजी गांधी यांनी सुरुंग लावून सत्तेतून बाहेर कसे केले हे भाजपाला कळले नाही.
दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमी भाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देणार, अशी आश्वासने २०१४ साली मोदींनी दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत, याचा जनतेत प्रचंड राग आहे. सुधीर मुनगंटीवार, अनुज धोत्रे या भाजपा उमेदवारांना जनतेने जाब विचारला.
मागील १० वर्षात काय केले असे प्रश्न जनता विचारत आहे. अनेक गावात भाजपाचे उमेदवार व नेत्यांना हाकलून दिले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. मोदींची गॅरंटी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन सारखीच फसवी आहे. ते जरी पुन्हा आले तरी त्यांचा राजकीय आलेख घसरला आहे, एकनाथ शिंदेंच्या हाताखाली त्यांना काम करावे लागत आहे, असे लोंढे म्हणाले.
देशात आज भाजपा व मोदी विरोधी हवा आहे. मोदींनी कितीही प्रयत्न केले, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, निवडणूक आयोगाचा कितीही गैरवापर केला तरी भाजपाचा पराभव अटळ आहे.
भाजपाच्या अनेक नेत्यांना त्याची जाणीव झाली तशीच नवनीत राणा यांनाही झाली आहे. काहीही असो भाजपाचे काऊंटडाऊन सुरु झालेले असून लोकसभा निवडणुकीत या हुकूमशाही सरकार पराभव होऊन जनतेच्या विश्वासाचे नवीन सरकार येण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.