Tuesday, January 7, 2025
Homeमनोरंजनपुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर, १४ वा ‘मृदगंध पुरस्कार सोहळा...

पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर, १४ वा ‘मृदगंध पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबरला रंगणार…

मुंबई – गणेश तळेकर

लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला.

लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा. संपन्न होणार आहे.

या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी श्री. पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), श्री. ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार), श्रीमती सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र),

श्रीगौरी सुरेश सावंत (सामाजिक क्षेत्र), श्री. आदेश बांदेकर (आभिनय व सूत्रसंचालक), श्रीमती सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), श्री रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), श्रीमती दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र व विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत.

बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.

या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून श्री. तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. श्री विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज श्री विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रोहिणी हटट्गंडी (अभिनेत्री), श्री.जयराज साळगावकर (संपादक कालनिर्णय), श्री. संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त ठाणे) आदी मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

आजपर्यंत विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्कार प्राप्त मान्यवर

पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार,पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले, डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर,

ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र भिलारी, माया जाधव (जीवन गौरव), जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव),

पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (जीवनगौरव), सुदेश भोसले, आतांबर शिरढोणकर, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, केतकी माटेगावकर हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: