अमरावती : बडनेरा आमदार रवी राणा आणि उद्भव ठाकरे यांच्यातील वाद जनतेला नवखे नाहीत. यामुळे दोन्ही कडील कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांवर चिखलफेक करतात पाहायला मिळतात, आज तर प्रकरण मारहाणी पर्यंत गेले अंजनगाव सुर्जी येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमानंतर रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आमदार रवी राणा यांच्यासोबतही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळी ६;३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे अंजनगावात सोमवारी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम आटोपून आमदार राणा व कार्यकर्ते अमरावतीकडे जाण्यासाठी निघाले असताना नवीन बसस्थानक परिसरातील अग्रसेन चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आमदार राणा व त्यांच्या कार्यकर्त्यानी महेंद्र दिपटे यांना जबर मारहाण केल्याचे सांगण्यात आले, तर महेंद्र दिपटे यांनी रवी राणा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. महेन्द्र दिपटे यांना उपचारसाठी रूग्णालयात दाखल केले असल्याची प्राथमिक समोर आली. तर रवी राणा यांच्यावर चाकू घेवून प्राणघातक हल्ला केल्याची सोशल मिडिया पोस्ट फिरवत असल्याचं निदर्शनास आले. मात्र आमदार यांच्यावर चाकू हल्ला झाला नसल्याचे अमरावती पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले.
मारहाणीचे कारण…
आमदार राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कार्यक्रमात अपशब्द वापरल्यावरून हा वाद झाल्याचे समजते. आमदार राणा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. महेंद्र दिपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली. यावेळी दोन्ही कडील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून अधिक तपास अंजनगाव पोलीस करीत आहे.