Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीमंत्री पदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे पोलिसांत तक्रार दाखल; पाळत...

मंत्री पदाच्या लेटरहेडवर अशोक चव्हाणांच्या नावाने बनावट पत्रे पोलिसांत तक्रार दाखल; पाळत व घातपाताचाही संशय…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. विशेष म्हणजे या बाबीची कुणकुण त्यांना अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

त्यानुसार त्या प्रकरणाची ३१ जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली.

ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे, त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एवढेच नव्हे तर मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: