अकोला – अमोल साबळे
गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या उपचाराचे कवच आता पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे या योजनेत आणखी २०० रुग्णालयांना सहभागी करून घेणार असून आजाराची संख्या १,३०० च्या वर जाणार आहे. २०१२ साली सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत गरीब रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे
उपचार मोफत मिळत आहेत. योजनेत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून राज्यातील एक हजार रुग्णालयांत ही योजना राबवली जाते. राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते, तसेच १,२०९ आजारांचा त्यात समावेश आहे.