Tuesday, November 5, 2024
Homeराजकीयपक्षवाढ सोडून प्रांताध्यक्ष लोक जागर वाढीकरिता प्रयासरत…पक्ष संस्थापक मंत्री पदाकरिता प्रतीक्षारत…तर प्रहार...

पक्षवाढ सोडून प्रांताध्यक्ष लोक जागर वाढीकरिता प्रयासरत…पक्ष संस्थापक मंत्री पदाकरिता प्रतीक्षारत…तर प्रहार कार्यकर्त्यांची होत आहे सैरभैर गत…

आकोट- संजय आठवले

राज्यातील ढवळून निघत असलेल्या राजकीय वातावरणामुळे मुंबईपासून थेट गावाच्या गल्लीपर्यंत सर्वच पक्षात काही ना काही हालचाली सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि सर्वोच्च न्यायालयाने विद्यमान सरकारची भाकरी उलथविल्यास अटळ ठरणारी विधानसभा निवडणूक याकरिता सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आसुसलेले असतानाच प्रहार पक्षाच्या प्रांताध्यक्षांनी पक्षवाढ सोडून आपल्या लोकजागर मंच वाढीकरिता स्वतःला झोकून दिल्याने आणि प्रहार संस्थापक यांनी मंत्रीपदावरच लक्ष केंद्रित केल्याने आकोट तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते नैराश्यात सापडले आहेत.

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात प्रहार संघटना उदयास आली. तेथील युवकांनी जीव मोल प्रयास करून ही संघटना नावारूपास आणली. ह्याच युवाशक्तीने ओमप्रकाश कडू यांना आमदारही करून दाखवले. रुग्ण, अपंग यांची मसीहा म्हणून ही संघटना ओळखली जाऊ लागली. अमरावती जिल्ह्यात या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. अचलपूर तालुक्याचा शिवभाऊ असलेल्या आकोट तालुक्यातही या संघटनेचे लोन पसरले. सागर उकंडे आणि गोलू भगत या युवकांनी आकोटात या संघटनेची गुढी उभारली. त्यानंतर आता हयात नसलेल्या तुषार पुंडकर या महत्वकांक्षी युवकाचे हाती या संघटनेची धुरा आली. अनेक लटपटी खटपटी करून या युवकांनी आकोट परिसरात या संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली. परंतु पोरा सोरांची संघटना म्हणून प्रस्थापित राजकारण्यांनी या संघटनेची संभावना केली.

अशातच विधानसभा निवडणुकीत या संघटनेने तुषार पुंडकर ह्याला आकोट मतदार संघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत या संघटनेने लक्षवेधी मते प्राप्त केली. आणि तेथून ही संघटना दखलपात्र बनली. अनेकांच्या आशाळलेल्या नजरा या संघटनेकडे वळल्या. या यशामुळे ही संघटना राजकीय पक्ष म्हणून आपली ओळख सांगू लागली. प्रहार पक्षाची अशी आगेकूच सुरू असतानाच तुषार पुंडकर याची हत्या झाली. त्यामुळे आकोट मतदार संघात प्रहार पक्ष बॅक फुटवर आला. अशा अवस्थेत तेल्हारा तालुक्यातील अनिल गावंडे यांनी प्रहार पक्ष वाढीचे कंकण बांधून चक्क प्रांताध्यक्ष पद काबीज केले. या नियुक्तीला खकोट तेल्हारा तालुक्यातून प्रचंड विरोध करण्यात आला.

अनिल गावंडे हे लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याने काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांना नेता मानून त्यांनी शिवबंधनही बांधले होते. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आकोटची उमेदवारी नाकारण्यात आली. त्याने ते रुष्ट झाले. त्यानंतर आकोट मतदार संघात ‘मराठा कार्ड’ म्हणून आपली उमेदवारी घोषित करण्याकरिता वंचित आघाडीचीही त्यांनी चाचपणी केली होती. तिथेही त्यांना ‘रेड सिग्नल’ दिला गेला. त्यामुळे त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम केली. याच लढतीत तुषार पुंडकर आणि त्यांची बरीच हातघाईही झाली होती.

त्यानंतर अनिल गावंडे यांनी थेट ओम प्रकाश कडू यांच्याशी संपर्क साधला. आणि प्रहार पक्ष वाढीच्या अटीवर त्यांना प्रांत अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. या नियुक्ती बाबत आकोट तेलारा तालुक्यातील प्रहार कार्यकर्ते आजही नाखुश आहेत. तशाही अवस्थेत गावंडे यांनी आपल्या कामाचा ओनामा केला. गत सुमारे दीड वर्षापासून आकोट तेल्हारा तालुक्यात त्यांच्या पक्ष वाढीचा कोणताही प्रभाव दिसलेला नाही, अशी कुरबुर प्रहार कार्यकर्ते करू लागले आहेत. त्यातच अनिल गावंडे यांनी प्रहार पक्षवाढी ऐवजी आपल्या लोकजागर मंचला महत्त्व देणे सुरू केले आहे. आकोट तेल्हारा तालुक्यांमध्ये या माध्यमातून ते अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. महिलांचे संक्रांत मेळावे, कवी संमेलन, गीत गायन, व्याख्यान यानिमित्ताने लोकजागरच्या बॅनरखाली जनमानसात ते आपली ओळख निर्माण करीत आहेत. अर्थातच हे सारे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सहेतूक केले जात आहे. परंतु लोकजागर मंचऐवजी हेच सोहळे प्रहारच्या नावावर घ्यावेत, जेणेकरून प्रहार हे नाव जनमानसात पोहोचेल असा प्रहार कार्यकर्त्यांचा सूर आहे. हे आयोजन लोकजागर मंच द्वारे होत असल्याने स्वाभाविकच या सोहळ्यांमध्ये प्रहार कार्यकर्त्यांना ना भाव दिला जात आहे ना वाव दिला जात आहे. त्यामुळे प्रहार कार्यकर्ते अधिकच सैरभैर झाले आहेत.

अशा अवस्थेत प्रहार संस्थापक अध्यक्ष ओम प्रकाश कडू हे आपल्याला मंत्रीपद मिळणेकरिता अविश्रांत खपत आहेत. त्यामुळे मंत्री पदापेक्षा हे प्रकरण मोठे नसल्याने त्यांनीही या प्रकरणाकडे तूर्तास डोळेझाक केलेली आहे. कदाचित मंत्रीपदी त्यांची वर्णी लागल्यावर ते या प्रकरणात लक्ष घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे होईपर्यंत प्रहार कार्यकर्त्यांना संयमाखेरीज अन्य पर्याय नसल्याचे दिसत आहे.

नगरपालिका निवडणूक तोंडावर आहे. त्या स्थितीत पक्षांतर्गत फूट पडली तर निवडणुका कशा लढवाव्यात? पक्षाचे प्रमुख पदाधिकारीच जर पक्षाचे नाव दूर ठेवून स्वतःचा सवतासुभा तयार करण्याकरिता आपल्या वैयक्तिक संघटनेद्वारे विविध कार्यक्रम राबवित असतील तर हे पक्षाकरिता घातक आहे. बच्चुभाऊंनी यात लक्ष घालून ही घडी नीट बसवावी अथवा संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त्त करावी–सागर ऊकंडे, शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती आकोट.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: