कोकण – गणेश तळेकर
कोकणातील कलावंतांचे कलागुण सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने तसेच कोकणातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणाऱ्या सिंधुरत्न कलावंत मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘कोकण चित्रपट महोत्सव २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मालवणमधील मामासाहेब वरेरकर नाट्यगृहामध्ये पुरस्कार सोहळ्याच्या रूपात या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
शनिवार १६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मराठी तारे-तारकादळच मालवणमध्ये अवतरले. मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या परफॅार्मन्सने सजलेल्या या सोहळ्यात ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या, अभिनेता ओमकार भोजनेने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या आणि प्रियदर्शनी इंदलकरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणपतीच्या आरतीने पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विजय पाटकर यांनी मनोगत व्यक्त करत कोकण चित्रपट महोत्सवाची संकल्पना विषद केली.
कोकण चित्रपट महोत्सव उत्तरोउत्तर मोठा होत असताना, “मी इथेच म्हातारा होईन असे सांगत कोकणातील कलावंतांची कला जगभर पोहोचवण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंच कायम अग्रेसर राहील” अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून मालवणमध्ये दाखल झालेल्या सर्व कलावंत, पत्रकार, रसिक आणि मान्यवरांचे विजय पाटकर यांनी स्वागत केले.
दिगंबर नाईकने मालवणी स्टाईलने गाऱ्हाणे घातल्यानंतर खऱ्या अर्थाने पुरस्कार सोहळा सुरू झाला. पूजा सावंत, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, हेमलता बाणे, मीरा जोशी, मेघा घाडगे, शुभंकर तावडे, संतोष पवार, पॅडी कांबळे, अभिजीत चव्हाण, आनंदा कारेकर, आरती सोळंकी, सुहास परांजपे यांच्या नृत्य-अभिनयाने कोकण चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली.
या सोहळ्याला प्रमोद जठार, बाबा परब ,नरेंद्र पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते शिवाय या सोहळ्यासाठी खास करून सिंधुदुर्ग कलावंत मंचाचे पदाधिकारी प्रकाश जाधव, यश सुर्वे, प्रमोद मोहिते, उमेश ठाकूर, शितल कलापुरे, मनोज माळकर,गणेश तळेकर इत्यादींनी खूप सहकार्य केले.
‘सरला एक कोटी’ या चित्रटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नितिन सुपेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता ओमकार भोजने, सर्वोत्कृष्ट संगीतकार विजय नारायण गवंडे असे चार महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. ‘ती फुलराणी’ चित्रपटातील टायटल रोलसाठी प्रियदर्शनी इंदलकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘तमाशा LIVE’मधील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्याचा, तर ‘वाळवी’तील व्यक्तिरेखेसाठी नम्रता संभेरावला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे (दगडी चाळ २), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मनीष राजगिरे (धर्मवीर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रकाश भागवत (गाव आलं गोत्यात पंधरा लाख खात्यात), लक्षवेधी अभिनेता संदीप पाठक (विठ्ठल माझा सोबती), सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट ‘घे डबल’, विशेष चित्रपट पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’, लक्षवेधी चित्रपट ‘बापल्योक’, सर्वोत्कृष्ट कथा मकरंद माने-विठ्ठल काळे (बापल्योक), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार वासुदेव राणे (दगडी चाळ २),
सर्वोत्कृष्ट संकलक जयंत जठार (टाइमपास ३), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव (धर्मवीर), लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब, सर्वोत्कृष्ट लघुपट ‘पाळी’, सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक अनिकेत मिठबावकर, कोकणात चित्रीत करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ ‘मोरया रे…’ (डीके फिल्म्स अँड म्युझिक), सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शक नितीन दत्ता सातोपे (मोरया रे) यांना प्रदान करण्यात आले.
विशेष पुऱस्कारांमध्ये मुंबई न्यूज २४ x ७ चे एडिटर इन चीफ सचिन चिटणीस, पुढारी वाहिनीचे श्रेयस सावंत आणि ई-सकाळच्या प्रेरणा जंगम यांना पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या ‘सिंधुरत्न पत्रकार पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. अभिनेत्री अर्चना नेवरेकर पुरस्कार यांना कोकणची शान पुरस्कार यांना देण्यात आला.
प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, पंढरीनाथ कांबळी, दिगंबर नाईक, संतोष पवार यांना ‘कोकणरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. लीना नांदगावकर यांना ‘सिंधुरत्न कोकण कन्या पुरस्कार’ देण्यात आला. दिगंबर नाईकने मालवणी भाषेत, तर संदीप पाठकने मराठवाडी शैलीत पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सिंधुरत्न कलावंत मंचचे सचिव विजय राणे यांनी आभार प्रदर्शन केले.
११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोत्सवाचे उदघाट्न करण्यात आले होते. १२, १३ व १४ डिसेंबरला महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखवण्यात आले. १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी झाले. १६ डिसेंबरला पुरस्कार वितरण समारंभाच्या रूपात महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला.
Still फोटोग्राफी – सूचित तांबे