Karnataka Election Results : आज जाहीर झालेल्या मतमोजणीच्या ट्रेंडनुसार कर्नाटकातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी 100 च्या पुढे जादुई आकडा गाठला आहे. त्याचवेळी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही पराभव स्वीकारला आहे. या पराभवाने सोशल मिडीयावर चांगलीच धांदल उडवून दिली आहे. अनेक प्रकारचे मिम्स व्हायरल होत आहेत.
याचबरोबर विरोधकही भाजपवर चांगले तोंडसुख घेत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या खासदार यांनी ट्विटमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकातील प्रचारावरून टोमणा लगावला आहे. “पंतप्रधान मोदींनी कर्नाटकात केलेल्या प्रचाराला हनुमानाने सुद्धा नाकारलं आहे. माध्यमे जे.पी नड्डा आणि बोम्मई यांचा पराभूत झालेला चेहरा दाखवू शकतात. पण, हा पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. कारण, प्रचाराची धुरा मोदींनी सांभाळली होती,” असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं.
या निवडणुकीत भाजपला संदेश मिळाला आहे की सार्वजनिक समस्यांवर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (शिगाव) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार (कनकपुरा) आपापल्या जागेवर पुढे आहेत. हुबळी-धारवाड मध्यमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत. आतापर्यंतचे निकाल पाहता काँग्रेसमध्येही जल्लोष सुरू झाला आहे. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, “हा भाजपला संदेश आहे की, लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्दे महत्वाचे, भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करू नका.”