आकोट – संजय आठवले
केंद्र शासन व राज्य शासनातर्फे त्यांच्या विविध योजनांची माहिती देणे करिता आपला संकल्प विकसित भारत या उपक्रमांतर्गत आकोट शहरात शासकीय वाहनासोबत अधिकारी वर्ग फिरत असून या वाहनावर ‘मोदी सरकारची हमी’ असे लिहिलेल्या वाक्यावर ‘ही प्रधानमंत्री मोदींची हमी कि नागरिकांना फसवण्याची योजना?’ अशी पृच्छा नागरिक करीत आहेत. या संदर्भात काहीही बोलता येत नसल्याने जनतेसमोर अधिकाऱ्यांची मात्र मोठी गोची होत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय अध्यादेशानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे करिता मोठमोठे बॅनर्स लावलेले वाहन आकोट शहरभर फिरत आहे. शहरातील चौकाचौकात हे वाहन उभे करून जमलेल्या लोकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समजावून सांगणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
त्याकरिता लोकांना बसण्याकरिता अधिकाऱ्यांकडून आसन व्यवस्थाही करण्याचे नियोजन यात समाविष्ट आहे. या वाहनावर लावलेल्या बॅनर्स वर मोठ्या अक्षरात ‘मोदी सरकारची हमी’ असे लिहिलेले असून त्याचे बाजूला प्रधानमंत्री मोदींचा मोठा फोटो ही आहे.
या उपक्रमाची जबाबदारी आकाशवाणी अकोलाचे प्रसार अधिकारी शिवाजी गोळे व प्रकाश वैद्य यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे. या अधिकाऱ्यांसमवेत पालिकेचे कर्मचारी ही नियुक्त करण्यात आलेले आहेत. परंतु या उपक्रमाचा जराही फायदा होताना दिसून येत नाही. निर्धारित चौकात उभे केलेले वाहन, अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे बाजूला ठेवलेली खुर्च्यांची चळत असेच दृश्य या संदर्भात दिसून येत आहे.
त्याखेरीज ‘मोदी सरकारची हमी’ या वाक्यावरही नागरिकांच्या तिखट, खारट, तुरट, आंबट आणि संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. त्यांचे मते देशात केंद्र शासन आहे, मोदी शासन नाही. त्यामुळे ‘केंद्र सरकारची हमी’ अथवा ‘भारत सरकारची हमी’ असे लिहावयास हवे होते. त्यासोबतच ही ‘प्रधानमंत्री मोदींची हमी कि नागरिकांना फसविण्याची नवी शक्कल?’ असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
येथे उल्लेखनीय आहे कि, समाज माध्यमांमध्ये काहीच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामध्ये उपस्थित नागरिक ‘मोदी सरकारची हमी’ या वाक्याला प्रचंड विरोध करताना दिसत होते. त्याच व्हिडिओचा प्रभाव अख्या राज्यात पडला असल्याचे आकोट शहरातील या प्रश्नांनी दिसून येत आहे.
येथेही अनेक नागरिक या वाक्यावर संताप व्यक्त करून अधिकाऱ्यांना प्रश्नांचे माध्यमातून भंडावून सोडत आहेत. अनेक सुजाण व माहितगार नागरिकांनी हा उपक्रम म्हणजे मोदीचा प्रचार कार्यक्रम असून त्या प्रचाराकरिता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचार कार्यकर्ता म्हणून वापर करून घेण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून अख्ख्या भारतात सुरू असलेल्या या उपक्रमाचे माध्यमातून प्रधानमंत्री मोदी देशाच्या तिजोरीला करोडो रुपयांचा चुना लावीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या साऱ्या प्रतिक्रिया व नागरिकांचे प्रश्नांनी अधिकारी, कर्मचारी मात्र भंडावून गेले आहेत. ते बिचारे जो जे काही बोलतो ते मुकाटपणे ऐकून घेत आहेत. नागरिकांच्या या रोषामुळे कधी एकदा ही मोहीम संपते आणि आपण या कटकटीतून मुक्त होतो असे अधिकाऱ्यांना वाटायला लागले आहे.