Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यडॉक्टर जपसरेंवरील आरोप उच्च न्यायालयाने फेटाळले…आकोट न्यायालयानेही केली निर्दोष मुक्तता…

डॉक्टर जपसरेंवरील आरोप उच्च न्यायालयाने फेटाळले…आकोट न्यायालयानेही केली निर्दोष मुक्तता…

आकोट – संजय आठवले

मृतदेहाची विटंबना करणे, खोटी कागदपत्रे बनविणे व अन्य कागदांचा स्वहिताकरिता वापर करणे या आरोपाखाली आकोट शहर पोलिसांनी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर कैलास जपसरे यांचे विरोधात २०१८ मध्ये दाखल केलेल्या आरोपांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावले असून त्या संदर्भात आकोट न्यायालयात सुरू असलेला खटला खारिज करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने डॉक्टर जपसरे यांचे वरील मोठा कलंक पुसल्या गेला आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी कि, सन २०१८ मध्ये डॉक्टर कैलाश जपसरे यांचे आकोट येथील रुग्णालयात मनोज प्रभुदास तेलगोटे या युवकाला अत्यवस्थ स्थितीत उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिनांक २२.४.२०१८ रोजी या युवकाचा मृत्यू झाला.

डॉक्टर जपसरे यांनी त्याचे नातेवाईकांना याची कल्पना दिली. तथापि त्यांनी रुग्णास अन्यत्र हलविण्याची मागणी केली. त्यावर डॉक्टर जपसरे यांनी रुग्ण मयत झाल्याने त्याचे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. त्यावर स्वाक्षरी करून रुग्णाचे नातेवाईकांनी रुग्णास अकोला येथे नेले. त्यावेळी तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

त्यानंतर दिनांक ५.५.२०१८ रोजी रुग्णाचे वडिलांनी आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावर याप्रकरणी सखोल चौकशी व वैद्यकीय समितीच्या तज्ज्ञांच्या अहवालाचे आधारे गुन्हे दाखल करणे गरजेचे होते.

मात्र आकोट पोलिसांनी ही कोणतीच प्रक्रिया पार न पाडता डॉक्टर जपसरे यांचे विरोधात मृतदेहाची विटंबना करणे, खोटे दस्तावेज बनविणे, आणि इतरांचे दस्तावेजांचा स्वहितार्थ उपयोग करून घेणे या सदराखाली गुन्हे दाखल केले. त्यानंतर प्रकरण आकोट न्यायालयात दाखल करण्यात आले.

त्यावर डॉक्टर जपसरे यांनी आपल्यावर अन्याय झाल्याने नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरून या प्रकरणात वैद्यकीय समितीच्या तज्ज्ञांचा अभिप्राय बोलाविण्यात आला. सोबतच शवविच्छेदनाकरिता गाडलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. परंतु मृतदेहाची स्थिती शवविच्छेदनालायक नसल्याने त्याचे शवविच्छेदन करता आले नाही.

दुसरीकडे वैद्यकीय समितीने जपसरे यांनी बनविलेले कागद निर्दोष असल्याची ग्वाही दिली. त्यावर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश देशपांडे यांचे पिठाने याप्रकरणी डॉक्टर जपसरे हे निर्दोष असल्याचा निर्वाळा देऊन आकोट न्यायालयाने त्यांचे विरोधातील खटला खारीज करण्याचा आदेश दिला.

उच्च न्यायालयाचे या आदेशावरून आकोट न्यायालयाचे जुडिशियल मॅजिस्ट्रेट भानुप्रताप चौहान यांनी हा खटला खारीज केला आहे. त्यामुळे डॉक्टर जपसरे यांची निर्दोष मुक्तता केल्या गेली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालाने डॉक्टर कैलास जपसरे यांचेवर लागलेला मोठा कलंक पुसल्या गेला आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: