रामटेक – राजु कापसे
रामटेक :- दिवाळी हा सण संपूर्ण भारत वर्षात अतिशय आनंदाचा सण म्हणून सहज साजरा केला जातो. या सणाचे निमित्ताने सर्वत्र नवीन वस्त्र, पंचपक्वान्न, फराळ, फटाक्यांची आतषबाजी, घरांची सजावट आणि दिव्यांची आरास, झगमगाट सर्वत्र बघायला मिळते तर दुसरीकडे ज्यांच्या आयुष्यात दिवाळीच्या दिवशी देखील प्रकाशाचे दीप प्रज्वलित होत नाहीत अश्या व्यक्तींच्या आयुष्यात दिवाळीचे औचित्य साधून आनंदाचे क्षण साजरे करण्याचे कार्य काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निःस्वार्थपणे केले जाते.
माणुसकीचा हा वारसा जपण्याचे काम पारशिवनी तालुक्यात मागील नऊ वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. यावर्षी आकाशझेप फाऊंडेशन रामटेक, परीक्षेत अधिकारी कार्यालय नागलवाडी व कोलीतमारा (वन्यजीव), सामाजिक कार्यकर्ता व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पेंच व्याघ्र प्रकल्पातील शिलादेवी या आदिवासी गावात १० नोव्हेंबरला ‘आनंदोत्सव’ उपक्रमांतर्गत सर्व ग्रामस्थांना नवीन वस्त्र, मिठाई, ब्लॅंकेट, कचराकुंडी व इतर भेटवस्तू वितरण करून धनत्रयोदशीच्या शुभ पर्वावर आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, प्रमुख पाहुणे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, उद्घाटक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, पं. स. सभापती मंगलाताई निंबोणे, माजी जि.प. अध्यक्षा रश्मीताई बर्वे, शिक्षण सभापती राजूभाऊ कुसुंबे, सदस्य दुधाराम सव्वालाखे, सेवानिवृत्त बी.डी.ओ. प्रदीप बमनोटे, डॉ. इरफान अहमद यांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि गावकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांना आयोजन समिती तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आनंदोत्सव उपक्रमाचे शिल्पकार व से.नि.बी.डी.ओ. प्रदीप बमनोटे, तसेच मुख्य सूत्रधार पत्रकार गोपाल कडू, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अरविंद राठोड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण लेले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील ४५ स्त्री-पुरुषांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे यांनी संचालन केले. आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार यांनी दानदात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. आकाशझेपचे संचालक मा. वैभवराव तुरक साहेब सदस्य मा .सुभाष चव्हाण, मा. पंकज माकोडे, मा. धनराज मडावी, सदस्या शुभाताई थुलकर, शिक्षक संजय लोखंडे, अफरोज खान, इमरान बाघाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.